

पालघर : हनिफ शेख
पालघर जिल्ह्यात सक्षम आरोग्य सुविधा उभ्या करण्यासाठी सक्षम आरोग्य यंत्रणा असणे आवश्यक असल्याची बाब अनेकदा अधोरेखित झाली. यामुळेच आता जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या जिल्हा आरोग्य विभागाकडून 11 प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध प्रकारच्या जवळपास 21 उपकरणे आणि साहित्यांची उपलब्धता होणार आहे. याच्या खरेदी प्रक्रियेच्या हालचाली सध्या सुरू असल्याचे दिसून येत आहे.
ही समाधानाची बाब असली तरी अनेक रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी,नर्सेस,पर्यवेक्षक फार्मासिस्ट अशी अनेक जागा रिक्त आहेत तर अनेक नवीन बांधलेले उपकेंद्र सुद्धा कर्मचाऱ्यांना अभावी पडक्या वाड्यांसारखे उभे आहेत असे असताना प्राथमिक आरोग्य केंद्रात तज्ञ स्टाफ नसताना शासन मात्र कोट्यवधी रुपयाची उपकरणे बसवून नेमका कोणता विकास करू पाहत आहे. असा सवाल आता या भागातील नागरिक विचारू लागले आहेत. यामुळे आजवर आरोग्य विभागात अनेक योजना राबविण्यात आल्या मात्र आज त्या योजनांचे काय झाले हा संशोधनाचा भाग आहे यामुळे ही स्मार्ट टर्न की योजना सुद्धा काही दिवसात धुळखात पडली तर नवल वाटायला नको अशीच एकूण परिस्थिती या भागातील आहे.
या साहित्य पुरवठ्यासाठी चंद्रानगर (डहाणू), सायवन (डहाणू), जामसर (जव्हार), खोडाळा (मोखाडा), उधवा (तलासरी), गोरे (वाडा), खानिवली (वाडा), मलवाडा (विक्रमगड), केळवा माहीम (पालघर), सातपाटी (पालघर) आणि दांडी (पालघर) या काही शहरी आणि काही ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रांचा या योजनेत समावेश केलेला आहे.
यासाठी स्मार्ट ओपीडी फर्निचर, स्मार्ट हॉस्पिटल इंटरमेंट किट प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात पाच घेणार आहेत याशिवाय सुसज्ज कर्मचारी रूम, प्रसूती टेबल प्रसूती किट, सुसज्ज प्रसूत रूम ,आरोग्य केंद्राच्या इमारतीत एकूण 23 साहित्यांचा यामध्ये समावेश आहे आणि सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी समप्रमाणात याची खरेदी तर फर्निचर सारख्या वस्तू बनवून सुद्धा देणार असल्याचे दिसून येत आहे.
आरोग्य विभागाच्या या निर्णयाचे स्वागत होत आहेत. मात्र आठ कोटी रुपये खर्चून खरेदी करण्यात येणाऱ्या या साहित्यांची हाताळणी करू शकेल असे तज्ञ आज आरोग्य विभागाकडे आहे का याचे उत्तर सध्यातरी कोणाकडेच नाही. कारण की आज अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिस्थिती पाहिली असता अनेक रुग्णांसाठीच्या खाटा गंजत पडलेले आहेत अनेक मशीन बंद आहेत.
ऑपरेशन थेटर तर जवळपास बंदच आहे. कारण की कॉन्ट्रॅक्ट बेसवर असलेले डॉक्टर किंवा नर्स हे ऑपरेशन करू शकतील का किंवा त्यांना तसा अधिकार तरी आहे का हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहिला आहे. मग या खरेदीमध्ये ऑपरेशन थेटर अनेक ट्रॉल्याचा उल्लेख आहे. कॉम्प्युटरचा उल्लेख आहे हे नेमके कोण हाताळणार याचे देखील उत्तर आरोग्य विभागाने देणे आवश्यक आहे. यामुळे ही सर्व खरेदी खऱ्या अर्थाने प्राथमिक आरोग्य केंद्रांना स्मार्ट करण्यासाठी घेण्याचे प्रयोजन आहे की केवळ ठेकेदार जगविण्यासाठी ही खरेदी होत आहे असा सवाल आता उपस्थित झाला आहे.