डहाणू : डहाणू नगर परिषदेच्या 2 डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत 29 तृतीयपंथी मतदारांनी उत्साहाने मतदान केले. मात्र मतदान करूनही त्यांची अधिकृत नोंद तृतीयपंथी म्हणून न होता महिला मतदार म्हणून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे तृतीयपंथी समाजात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
प्रभाग क्रमांक 10 अ मध्ये एका तृतीयपंथी मतदाराने, तर प्रभाग क्रमांक 10 क मध्ये 28 तृतीयपंथी मतदारांनी मतदान केले. मात्र निवडणूक यंत्रणेच्या अधिकृत आकडेवारीत फक्त एका मतदाराची नोंद इतर (तृतीयपंथी) म्हणून झाली आहे. उर्वरित 28 जणांची नोंद महिला मतदार म्हणून करण्यात आली आहे.
संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार बजावूनही आम्हाला आमची खरी ओळख नाकारण्यात आली, अशी भावना तृतीयपंथी मतदारांनी व्यक्त केली आहे. बोटाला शाई लागली, मतदान झाले, पण आमची ओळख चुकीच्या श्रेणीत दाखवण्यात आली, अशी त्यांची तक्रार आहे. यामुळे मतदार नोंदींमध्ये घोळ झाल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.
लोकशाहीचा अपमान असल्याचा आरोप
या प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या उज्वला डामसे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सात वर्षांपूर्वी सुमारे 40 तृतीयपंथी नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. असे असतानाही ही चूक होणे म्हणजे तृतीयपंथी समाज आणि लोकशाहीचा अपमान असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. केंद्र आणि राज्य शासन समान हक्कांची घोषणा करत असताना स्थानिक पातळीवर मात्र तृतीयपंथींच्या अस्मितेकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आम्ही यापूर्वीही अनेक वेळा मतदान केले आहे. तेव्हा कधीच अडचण आली नव्हती. यावेळी मात्र आम्हाला महिला श्रेणीत टाकून आमची ओळख नाकारण्यात आली.रेश्मा पवई, गुरू, डहाणू तृतीयपंथी समाज