विक्रमगड ः ग्रामीण भागात कधीकाळी प्रत्येक घराच्या अंगणात उखळ-मुसळाचा आवाज घुमत असे. लाकडी घमेले, डाव, पाट-वरवंटे, चक्क्या, रंधणी अशी पारंपरिक भांडी दैनंदिन वापरात होती. मात्र काळानुसार झालेल्या आधुनिकीकरणामुळे विक्रमगड तालुक्यात ही पारंपरिक लाकडी उपकरणे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आज ही साधने जुन्या घरांच्या ओसरीत, क्वचित संग्रहालयात किंवा छायाचित्रांमध्येच पाहायला मिळत आहेत.
विक्रमगड व जव्हारच्या डोंगरपट्ट्यातील आदिवासी भागांमध्ये लाकूड हा केवळ बांधकामासाठी नव्हे, तर स्वयंपाकघरातील अत्यंत महत्त्वाचा घटक होता. भात कांडण्यासाठी उखळ-मुसळ, मसाले भरडण्यासाठी रंधणी, तसेच साठवणीसाठी लाकडी घमेले, डाव व डबकी यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असे. ही भांडी पूर्णतः नैसर्गिक, पर्यावरणपूरक आणि टिकाऊ होती. सध्या मिक्सर, ग्राइंडर तसेच स्टील व प्लास्टिकच्या भांड्यांनी या लाकडी उपकरणांची जागा घेतली आहे.
परिणामी गावोगावी लाकूडकाम करणारी कारागीर मंडळी दुसऱ्या व्यवसायांकडे वळताना दिसत आहेत. विक्रमगड येथील कारागीर रामदास सुतार सांगतात, “पूर्वी महिन्याला दहा-बारा उखळी तयार करायचो. आता महिन्याला एकही ऑर्डर मिळत नाही. लोकांना वेळ नाही आणि मशीनची सवय झाली आहे.”
या उपकरणांच्या निर्मितीसाठी लागणारे कौशल्य पिढ्यान्पिढ्या चालत आले होते. योग्य लाकडाची निवड, त्याला आकार देणे व कोरीवकाम करणे ही एक स्वतंत्र कला होती. मात्र आजच्या तरुण पिढीला या कलेबाबत फारशी माहिती नाही. स्थानिक ज्येष्ठ गृहिणी दमयंती सांबरे म्हणतात, “पूर्वी उखळीशिवाय स्वयंपाकच सुरू व्हायचा नाही. आता आमची नातवंडं उखळ पाहिलं तरी विचारतात हे काय असतं आजी?”
संवर्धनाची गरज
या पारंपरिक वस्तूंचे जतन व संवर्धन करण्यासाठी स्थानिक शाळा, महाविद्यालये आणि ग्रामपंचायतींच्या माध्यमातून लोकसंस्कृती संवर्धन उपक्रम राबवणे गरजेचे आहे. स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन देणे, तसेच पर्यटकांसाठी कार्यशाळा व ग्रामीण हस्तकला प्रदर्शनांचे आयोजन केल्यास या परंपरेला नवसंजीवनी मिळू शकते. विक्रमगड तालुक्यातील लाकडी उपकरणे केवळ घरगुती वस्तू नव्हत्या, तर त्या ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग होत्या. आज त्या नामशेष होत असल्या तरी योग्य प्रयत्नांनी हा मौल्यवान पारंपरिक वारसा पुन्हा उजाळा मिळवू शकतो.