Thane District Bank Pudhari
पालघर

Thane District Bank: जे गेले ते माझ्यासाठी मेले, नातेवाईक वगैरे कोणी नाही; आमदार हितेंद्र ठाकूर

जिल्हा बँक निवडणूक आता ' गंभीर 'वळणावर

पुढारी वृत्तसेवा

हनिफ शेख

पालघर: सहकारात पक्ष नसतो असे सांगून सुरुवात झालेली ठाणे जिल्हा पालघर बँकेची निवडणूक आता अतिशय प्रतिष्ठेची चुरशीची आणि तेवढीच गंभीर देखील बनली आहे. कारण की सुरुवातीला हलकीफुलकी वाटणारी ही निवडणूक परिवर्तन पॅनलने गंभीर करून टाकल्याचे चित्र आहे.

आजवर सहकार पॅनलचे वरिष्ठ मंडळी हे भाजप शिवसेना बहुजन विकास आघाडी राष्ट्रवादी अशी मिळून ही निवडणूक लढवत होते आणि बहुमताने विजय देखील होत होते मात्र या निवडणुकीत याच सत्ताधारी सहकार पॅनलला परिवर्तन पॅनलने जोरदार टक्कर देत निवडणूक गंभीर करून टाकली आहे.

कारण की सहकार पॅनल मधून लढणारे जव्हार आणि विक्रमगड या दोन्ही तालुक्यातील उमेदवार निशाणी वाटपाच्या दिवशी थेट परिवर्तन पॅनल मध्ये गेल्यानंतर सहकार पॅनलची धावपळ वाढली आहे.

तर परिवर्तन पॅनल कडून ही निवडणूक थेट पक्षीय पातळीवर प्रतिष्ठेची करण्यात आलेले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण देखील या निवडणुकीकडे लक्ष ठेवून असल्याचे दिसून येत आहे. यामुळे आता सहकार पॅनलची अधिक गोची झाली असून मतदारांना गळ घालण्यासाठी आता धावपळ उडाली आहे.

या निवडणुकीत ओबीसी जागेसाठी संचालक पदाच्या निवडीत परिवर्तन पॅनल कडून बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी हार्दिक राऊत उभे ठाकल्याने सहकार पॅनलची वसई विरार भागातील मतेही फुटू शकतात असा अंदाज बांधला जात आहे. राऊत हे सहकार पॅनलचे प्रमुख माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांचे नातेवाईक असल्याचे बोलले जात आहे यामुळे या निवडणुकीत अधिकच गोंधळ वाढला आहे.

याबाबत नुकतेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी आमदार ठाकूर यांनी विरोधकांना गंभीर इशारा दिला. यावेळी ठाकूर यांनी सांगितले की काही लोक एक मत मागत आहेत ही मताची भीक त्यांना देऊ नका लायकी नसताना पक्षाने त्यांना भरपूर पदे दिली.

यामुळे मला सोडून जाणारा कोणीही माझा नातेवाईक नाही जे गेले ते माझ्यासाठी मेले असेही ठाकूर यांनी पुढे सांगितल्याने सुरुवातीला खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक होईल असे वाटत असतानाच आताही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया गंभीर वळणावर येऊन ठेपली आहे.

तालुका निहाय जे संचालक आजपर्यंत पक्षीय विचार न करता सहकार पॅनल करून लढत होते त्यांना थेट पक्षाचा दबाव आल्याने त्यांनी परिवर्तन पॅनल मध्ये जाऊन निवडणूक लढायला सुरुवात केली आहे. यामुळे ऐनवेळी उमेदवार शोधण्याची वेळ सहकार पॅनल वर आली होती त्याच वेळी सहकार पॅनलचे दुसरे प्रमुख आमदार किसन कथोरे आणि परिवर्तन पॅनलचे प्रमुख माजी खासदार कपिल पाटील यांच्यामध्ये देखील मिडिया वार जुंपल्याचे दिसून येत आहे.

मतदार शोधण्यासाठी धावाधाव!

उरलेल्या 11 जागेसाठी सध्या निवडणूक होत असली तरी तालुका निहाय कृषी पतपुरवठा संस्थांच्या संचालक निवडीत जव्हार,विक्रमगड,पालघर आणि शहापूर या तालुक्यातील अनेक मतदार सध्या उमेदवारांनी गायब केल्याचे चित्र आहे यामुळे कोणाकडे किती मतदान यावरून आत्ताच निवडणुकीची गणिते मांडली जात आहेत मात्र अमुक एखादा मतदार तू माझाच कसा यामुळे थेट पाठलाग होण्याच्या घटना देखील घडत आहेत.

जव्हार तालुक्यातील सहकार पॅनल चा उमेदवार परिवर्तन पॅनल मध्ये गेल्यानंतर त्याच्याकडे असलेला एक मतदार हा सहकार पॅनल चा असल्याचा दावा करत त्या मतदाराला आपलेसे करण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.

यासाठी सहकार पॅनलचे काही पदाधिकारी थेट विमानाने गोवा या ठिकाणी गेल्याचे देखील समजते आहे मात्र परिवर्तन पॅनल लपवलेले सदस्य तिथूनही त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा पळवल्याचे चित्र आहे. यामुळे या पळवा पळवी ची चर्चा जिल्ह्यात जोर धरत आहे. जसजशी मतदानाचा दिवस जवळ येत चालला आहे तशी ही निवडणूक अधिक रंजीत होत चालली आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT