Attempt to Burn Alive Pudhari
पालघर

Attempt to Burn Alive: टेम्पो चालकाला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न; खडकोना गावाच्या हद्दीतील ढाब्यावरील घटना

ढाबा मालकाविरोधात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

पालघर: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मनोर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्राअंतर्गत वाडा-खडकोना गावाच्या हद्दीतील एका ढाब्यावर टेम्पो चालकाला बेदम मारहाण करीत पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याच्या प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

मारहाणीत गंभीर जखमी टेम्पो चालक दानिश खान (30) याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी ढाबा मालक आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी सायंकाळच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गुजरातच्या दिशेने जाणारा टेम्पो चालक दानिश खान आणि त्याचा सहाय्यक सोनु पाल वाडा खडकोना गावाच्या हद्दीतील जयअंबे ढाब्यावर विश्रांतीसाठी थांबला होता. कोल्ड्रिंक खरेदी केली आणि पैसे देऊन टेम्पो जवळ पोहोचल्यावर टेम्पोची चावी नसल्याचे त्याच्या लक्षात आले.

चावी शोधण्यासाठी ढाब्याच्या काउंटरवर जाऊन त्याने ढाबा मालकाकडे चावी बाबत विचारणा केली. ढाबा मालकाने चावी दिल्यानंतर टेम्पो चालकाला मंदिरात वीस रुपये दक्षिणा देण्यास सांगितले. सुट्टे पैसे नसल्याने दक्षिना देणे शक्य नसल्याचे सांगितल्याने ढाबा मालकाला राग आला.

ढाबा मालक आणि त्याच्या सोबतच्या आठ ते दहा कामगारांनी टेम्पो चालकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला काउंटरच्या शेजारच्या खोलीत नेवुन टी शर्ट काढत लाकडी काठी आणि चामडी पट्ट्यांने मारहाण केली.

त्यानंतर ढाबा मालकाने धमकी देत टेम्पो चालकाच्या अंगावर पेट्रोल ओतुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी टेम्पो चालकाचा साहाय्यक सोनु पाल सोडवण्यासाठी आला असता त्यालाही ढाबा मालक व कामगारांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

मदतीसाठी अपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधला असता काही वेळाने ढाब्यावर पोहोचलेल्या पोलिसांनी टेम्पो चालकाची ढाबा मालक आणि कामगारांच्या तावडीतून सुटका केली. गंभीर जखमी असलेल्या टेम्पो चालकाला उपचारासाठी मनोरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी टेम्पो चालकाने मनोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून ढाबा मालक आणि कामगारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT