पालघर: मुंबई अहमदाबाद महामार्गावरील टेन नाका परिसरात गुरुवारी मध्यरात्री गुजरात वाहिनीवरील नादुरुस्त वाहनाला टेम्पो धडकल्याने झालेल्या अपघातात टेम्पो मधील दोघे गंभीर जखमी झाले. नादुरुस्त वाहन महामार्गावरून हटवण्यासाठी चालकाने आपत्कालीन यंत्रणेकडे मागितलेली मदत वेळेत मिळाली नाही.त्यामुळे धोकादायक अवस्थेत महामार्गावार उभ्या नादुरुस्त ट्रकला भरधाव वेगातील टेम्पो धडकला.
गुरुवारी रात्री सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास टेन नाका भागात गुजरात वाहिनीवर एक ट्रक नादुरुस्त झाल्याने महामार्गावर धोकादायक अवस्थेत थांबली होती.ट्रक चालकाने आपत्कालीन यंत्रणेला संपर्क साधून ट्रक महामार्गावरून हटवण्यासाठी मदत मागितली होती.अर्ध्या तासानंतरही आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी पोहोचली नसल्याचा आरोप ट्रक चालकाने केला आहे.
नादुरुस्त वाहनाच्या मागच्या बाजूने वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी धोक्याची सुचना देणारी व्यवस्था नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता.दरम्यान अकरा वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगातील टेम्पोने नादुरुस्त ट्रकला धडक दिल्याने अपघात झाला. अपघातात टेम्पो चालक आणि त्याचा सहायक गंभीर जखमी झाले.त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नादुरुस्त वाहनांमुळे अपघातांचा धोका निर्माण होत असताना नादुरुस्त वाहने हटवण्याच्या कामात राष्ट्रीय महामार्गावरील आपत्कालीन यंत्रणा कुचकामी ठरत आहे.महामार्गावर दररोज हजारो वाहनांची वर्दळ असतानाही नादुरुस्त वाहनांना तातडीची मदत मिळत नसल्याचे समोर आले आहे.रात्रीच्या वेळी हायवे पेट्रोलिंग आणि आपत्कालीन सेवा कोलमडून पडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावर नादुरुस्त अवस्थेत बंद पडलेल्या वाहनांसाठी तात्काळ प्रतिसाद देणारी यंत्रणा अधिक सक्षम करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.दरम्यान मनोर पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.