अहमदाबाद महामार्गावर टेम्पो जळून खाक pudhari photo
पालघर

Ahmedabad highway tempo fire : अहमदाबाद महामार्गावर टेम्पो जळून खाक

महामार्गावर वाहनांना आगीच्या घटनांमध्ये वाढ

पुढारी वृत्तसेवा

पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खडकोना गावच्या हद्दीत मुंबई वाहिनीवर टेम्पो जळून खाक झाला. बुधवारी पहाटेच्या सुमारास टेम्पोला आग लागली होती. तारापूर एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले परंतु आगीत टेम्पो जळून खाक झाला.

टेम्पो लागलेल्या आगीचे कारण अस्पष्ट असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रसंगावधान राखल्यामुळे टेम्पो चालक सुरक्षित आहे. गेल्या आठवड्यात सोमटा गावाच्या हद्दीत झालेल्या अपघातात ट्रक आणि ट्रक चालक आगीत जळून खाक झाला होता.

महामार्गावर वाहनांना आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावर अग्निशमन यंत्रणा उभारण्यात महामार्ग प्राधिकरणाला अपयश आल्याने वाहन चालकांचे बळी जात आहेत.

मुंबई अहमदाबाद महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जात असलेला बुधवारी पहाटे साडे चार वाजण्याच्या खडकोना गावच्या हद्दीत मुंबई वाहिनीवर टेम्पोच्या इंजिन असलेल्या भागातून धूर निघत असल्याचे समजताच टेम्पो चालकाने टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा करून टेम्पोच्या केबिन मधून खाली उतरला, काही वेळात टेम्पोने पेट घेतला. टेम्पोला लागलेल्या आगीची माहिती महामार्ग सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळताचा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.

महामार्ग सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी टेम्पोला लागलेली आग विझवण्यासाठी तारापूर एमआयडीसीच्या अग्निशमन दलाला पाचारण केले होते. तासाभरात घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले परंतु उशिर झाल्याने टेम्पो जळून खाक झाला. क्रेनच्या साहाय्याने जळालेला टेम्पो महामार्गावरून हटवण्यात आल्यानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

गेल्या आठवड्यात मुंबई अहमदाबाद महामार्गावर मध्यरात्री धावत्या ट्रकला लागलेल्या भीषण आगीत ट्रकच्या चालक केबिनमध्ये अडकलेल्या ट्रक चालकाचा जळून मृत्यू झाला होता. मुंबई अहमदाबाद महामार्गावर पालघरच्या सोमटा येथील दुर्घटना घडली. महामार्गावर गुजरात वाहिनीवर ट्रकची पुढे जात असलेल्या समोरील वाहनाला धडक बसल्यानंतर ट्रकला लागली होती आग. ट्रक चालक जवान सिंग (२८) याचा जळून मृत्यू झाला होता तर गुरुसेवक सिंग (३८) जखमी झाला होता. दोघेही पंजाब राज्याचे रहिवासी आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT