कासा : डहाणू तसेच पालघर तालुक्यातील तवा आणि बऱ्हाणपूर या दोन ग्रामपंचायतींच्या हद्दीतून जाणाऱ्या तसेच परिसरातील पाच ते सहा गावांना जोडणाऱ्या तवा–बऱ्हाणपूर मार्गाची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडून डांबरीकरण उखडल्याने या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. वारंवार मागणी करूनही रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आंबेदे–बऱ्हाणपूर–तवा हा मार्ग परिसरातील अनेक गावांसाठी दळणवळणाचा प्रमुख मार्ग आहे. पुढे हा मार्ग मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडला जात असल्याने वाहतुकीच्या दृष्टीनेही त्याचे महत्त्व मोठे आहे. मात्र, महत्त्वाचा मार्ग असूनही गेल्या काही वर्षांपासून त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. बऱ्हाणपूर गावातील पऱ्हाडपाडा ते पाटीलपाडा या मार्गावर अनेक ठिकाणी रस्ता अक्षरशः उखडला आहे.
तवा गावातील नमपाडा परिसरातही मोठमोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात त्यामध्ये पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. त्यामुळे दुचाकीस्वार व चारचाकी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांसह शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी खराब रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. शेतमाल बाजारपेठेत पोहोचविताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असून वाहनांच्या दुरुस्तीचा खर्चही वाढत आहे. आजारी रुग्णांना दवाखान्यात नेतानाही वेळ लागत असल्याने आपत्कालीन परिस्थितीत हा रस्ता जीवघेणा ठरू शकतो, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.
ग्रामीण भागातील रस्ते व मूलभूत सुविधांसाठी शासनाकडून निधी उपलब्ध होत असताना तवा–बऱ्हाणपूर मार्गाच्या दुरुस्तीसाठी ठोस कार्यवाही का होत नाही, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. संबंधित प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. मार्गावरील सर्व खड्डे तातडीने बुजवून नागरिकांना दिलासा द्यावा. त्यानंतर दर्जेदार डांबरीकरण करून कायमस्वरूपी रस्ता तयार करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
केवळ थातूरमातूर खड्डे बुजविण्याऐवजी रस्त्याची गुणवत्ता तपासून मजबूत व टिकाऊ रस्ता तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच रस्त्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास आगामी निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करीत आहोत. मात्र आश्वासनांपलीकडे कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
दोन ग्रामपंचायती, दोन मतदारसंघ; जबाबदारी कोणाची?
तवा–बऱ्हाणपूर मार्गाचा काही भाग तवा तर काही भाग बऱ्हाणपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो. तसेच हा परिसर दोन विधानसभा मतदारसंघांत विभागला गेला आहे. बऱ्हाणपूर परिसर बोईसर विधानसभा मतदारसंघात, तर तवा परिसर पालघर विधानसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे रस्त्याच्या प्रश्नाची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.