Viraj Profiles Tarapur Pudhari
पालघर

Viraj Profiles Tarapur: विराज प्रोफाइल्सला एमपीसीबीचा दणका; उत्पादन बंदचे आदेश, धूर, धूळ आणि सांडपाण्यामुळे प्रदूषण

वायू व जलप्रदूषण आणि प्रदूषण नियंत्रण यंत्रणेतील त्रुटींची नोंद; पूर्वीच्या निर्देशांचे पालन न झाल्याने कारवाई

पुढारी वृत्तसेवा

बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील विराज प्रोफाइल्स लिमिटेड कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) उत्पादन कार्य बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

कंपनीतून होणारे वायू व जलप्रदूषण, प्रदूषण नियंत्रण यंत्रणेतील त्रुटी आणि यापूर्वी दिलेल्या निर्देशांचे पालन न झाल्याचे निरीक्षण नोंदवत मंडळाने ही कारवाई केली आहे. या निर्णयामुळे तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत कंपनीतील अॅनिलिंग फर्नेस आणि सबमर्ज्ड आर्क फर्नेसमधून मोठ्या प्रमाणात धूर व धूळ बाहेर पडत असल्याचे आढळले. ऑक्सिजन लान्सिंग प्रक्रियेत निर्माण होणारा धूर पूर्णपणे नियंत्रित होत नसल्याने परिसरातील हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे मंडळाने नमूद केले आहे.

कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ साचलेली असताना धूळ नियंत्रणासाठी नियमित पाण्याची फवारणी आणि व्हॅक्यूम क्लिनिंग होत नसल्याचेही पाहणीत आढळले. स्लॅग कूलिंग यार्डमध्ये पुरेशी प्रदूषण नियंत्रण यंत्रणा नसणे, अपुरे शेड आणि खुल्या जागेत जेसीबीच्या साहाय्याने धातूचे वर्गीकरण करताना उडणारी धूळ, या बाबीही मंडळाने नोंदवल्या आहेत.

याशिवाय पिवळसर रंगाचे सांडपाणी पावसाच्या नाल्यातून कारखाना परिसराच्या बाहेर जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वायुप्रदूषणासोबतच जलप्रदूषणाचाही गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

नियमांचे उल्लंघन

एमपीसीबीने १० जानेवारी २०२५ रोजी दिलेल्या अंतरिम निर्देशांचे कंपनीने पालन केले नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. जलप्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा, १९७४ च्या कलम ३३-अ आणि वायुप्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा, १९८१ च्या कलम ३१-अ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

कंपनीला सुरक्षित पद्धतीने उत्पादन बंद करण्याचे आणि नवीन उत्पादन बॅच सुरू न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच संबंधित यंत्रणांना कंपनीचा वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

विराज प्रोफाइल्सच्या विविध प्लांटमधून निघणाऱ्या धुराचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करून, सुमारे २५ निवेदने आणि मंत्रालय स्तरावर आंदोलनाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला. उशिरा का होईना, अखेर कारवाई झाली. तारापूर एमआयडीसीतील बलाढ्य कंपनीवर झालेली ही कारवाई म्हणजे प्रदूषणाविरोधातील लढ्याला मिळालेले यश आहे.
- अमोल गर्जे, सामाजिक कार्यकर्ते, बोईसर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT