तारापूरात प्रदूषण नियंत्रण यंत्रणा तोकडी pudhari photo
पालघर

Tarapur Pollution Issue : तारापूरात प्रदूषण नियंत्रण यंत्रणा तोकडी

मोजक्या अधिकाऱ्यांवर सोळाशेहून अधिक उद्योगांची जबाबदारी

पुढारी वृत्तसेवा

बोईसर : संदीप जाधव

आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तारापूर औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण नियंत्रण यंत्रणा सध्या अत्यंत अपुऱ्या मनुष्यबळावर कार्यरत असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. तब्बल सोळाशेहून अधिक उद्योगांचे पर्यावरणीय नियंत्रण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) केवळ एका उपप्रादेशिक अधिकारी व दोन क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर अवलंबून असल्याने वाढत्या प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण राखणे कठीण बनले आहे.

अलीकडेच तारापूर पर्यावरण विभागातील पाच क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यांच्या जागी चार अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र, यापैकी एका अधिकाऱ्याचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला असून दुसरा अधिकारी कर्करोगासारख्या गंभीर आजारामुळे प्रत्यक्ष कामकाजापासून दूर आहे. त्यामुळे प्रत्यक्ष उपलब्ध अधिकारी संख्या आणखी घटली असून उर्वरित अधिकाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण निर्माण झाला आहे.

1972 साली स्थापन झालेली तारापूर औद्योगिक वसाहत आज रासायनिक उद्योगांचा प्रमुख केंद्रबिंदू ठरली आहे. मात्र, अनेक उद्योगांमध्ये अद्याप आधुनिक प्रदूषण नियंत्रण तंत्रज्ञानाचा अभाव असून पर्यावरणीय नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. याचा थेट परिणाम वसाहतीलगतच्या गावांतील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवर होत असून ते दूषित होण्याच्या मार्गावर असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, नियमांचे काटेकोर पालन करणाऱ्या प्रामाणिक उद्योजकांनाच बेजबाबदार उद्योगांमुळे आर्थिक व प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा दबका आवाज उद्योग क्षेत्रातून पुढे येत आहे. अपुऱ्या यंत्रणेमुळे दोषी उद्योगांवर कारवाई होत नसल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

अपुरी यंत्रणा, वाढते आव्हान

विरार ते गुजरात सीमेलगत असलेल्या कारखाने, आरएमसी प्लांट, मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रे व स्टोन क्रशरमधून निर्माण होणारे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी मंडळाने स्वतंत्र उपप्रादेशिक अधिकारी कार्यालय स्थापन केले आहे. मात्र, या कार्यालयात केवळ एक उपप्रादेशिक अधिकारी व ठाणे प्रादेशिक कार्यालयातून नियुक्त करण्यात आलेला एक अर्धवेळ क्षेत्रीय अधिकारी कार्यरत आहे. याच काळात पालघर जिल्ह्यात प्रस्तावित वाढवण बंदर व मुरबे बंदर उभारणीचे काम सुरू असून औद्योगिक क्षेत्राचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे भविष्यात प्रदूषण नियंत्रणाचे आव्हान अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पालघरला प्रादेशिक कार्यालय हवे

2014 साली पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर अनेक शासकीय प्रादेशिक कार्यालये पालघर मुख्यालयी स्थलांतरित झाली. मात्र, आजही प्रदूषणविषयक तक्रारींसाठी उद्योजक व नागरिकांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ठाणे प्रादेशिक कार्यालयात जावे लागत आहे. ठाणे येथील प्रवास खर्चिक व वेळखाऊ ठरत असल्याने पालघर येथे स्वतंत्र प्रादेशिक कार्यालय सुरू केल्यास जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अतिरिक्त कामकाजाची जबाबदारीही प्रकाश ताटे यांच्याकडे

उपप्रादेशिक अधिकारी तारापूर1 कार्यालयातून गजानन पवार, केतन पाटील, स्वप्नील लिगंडे, तानाजी पाटील व उत्कर्ष शिनगारे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी महेंद्र पठ्ठेबहादूर व संदीप सोनावणे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, संदीप सोनावणे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असून प्रकाश ताटे कर्करोगाने त्रस्त आहेत. दरम्यान, तारापूर2 उपप्रादेशिक कार्यालयाचे अतिरिक्त कामकाज पाहण्याची जबाबदारीही प्रकाश ताटे यांच्याकडे देण्यात आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT