Tarapur MIDC Pudhari
पालघर

Tarapur MIDC: तारापूरमध्ये अनुदानित खतांचा काळाबाजार उघड?

एमआयडीसीत संशयित वाहतूक पकडली; मोठ्या रॅकेटची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

बोईसर: देशातील प्रमुख औद्योगिक क्षेत्रांपैकी एक असलेल्या तारापूर एमआयडीसीत शेतकऱ्यांसाठी असलेल्या अनुदानित युरिया खताचा बेकायदेशीर साठा व वाहतूक उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कृषी विभागाच्या फिर्यादीनंतर बोईसर पोलीस ठाण्यात टेम्पो मालक व चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टेम्पो पोलिसांनी संशयावरून अडवला असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर युरिया खताच्या गोण्या आढळून आल्या. या गोण्यांवर “औद्योगिक वापरासाठी युरिया” असा उल्लेख असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी असलेला अनुदानित युरिया वळवण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

तपासादरम्यान चालकाकडे आवश्यक कागदपत्रांचा अभाव आढळून आला. यानंतर पोलिसांनी टेम्पो जप्त करत पंचांसमक्ष कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. प्राप्त अहवालानंतर 10 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानित खताचा अपहार होत असल्याचे स्पष्ट झाले असून, शासनाच्या कृषी धोरणालाच तडा जात असल्याची भावना व्यक्त होत आहे. एकीकडे शेतकरी खतांच्या तुटवड्याने त्रस्त असताना दुसरीकडे असे प्रकार घडत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, यामागे संघटित रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित उद्योग, पुरवठादार व वाहतूक साखळीतील इतर घटकांची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता शासनाने उच्चस्तरीय चौकशी आदेश देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी व सामाजिक संघटनांकडून जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT