बोईसर : संदीप जाधव
तारापूर औद्योगिक वसाहतीतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) अखेर धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. ठाणे प्रादेशिक कार्यालयाच्या पथकांकडून करण्यात आलेल्या तपासण्यांमध्ये पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन आणि प्रदूषण नियंत्रण व्यवस्थेतील त्रुटी आढळलेल्या १२ उद्योगांना उत्पादन बंद करण्याचे आदेश, तर तब्बल ४० उद्योगांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याने तारापूरच्या औद्योगिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
तारापूर एमआयडीसीमध्ये रासायनिक, औषधनिर्मिती आणि विविध प्रक्रिया उद्योगांची मोठी संख्या आहे. उद्योगांमधून निर्माण होणारे सांडपाणी, घातक रासायनिक कचरा तसेच वायू उत्सर्जन यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध यंत्रणा आणि पर्यावरणीय निकष निश्चित करण्यात आले आहेत. मात्र काही उद्योगांकडून या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर एमपीसीबीच्या पथकांनी उद्योगांची तपासणी केली असता काही ठिकाणी प्रदूषण नियंत्रण यंत्रणांमध्ये त्रुटी, नियमांचे पालन न करणे तसेच पर्यावरणीय मानकांबाबत गंभीर बाबी निदर्शनास आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर मंडळाने संबंधित उद्योगांविरोधात कारवाईचे पाऊल उचलले आहे. गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळलेल्या १२ उद्योगांना उत्पादन बंद करण्याचे आदेश देण्यात आले. या कारवाईमुळे प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या उद्योगांना स्पष्ट संदेश मिळाला आहे.
दरम्यान, बंदी आदेशानंतर काही उद्योगांनी आवश्यक सुधारणा करून प्रदूषण नियंत्रणाच्या यंत्रणा कार्यान्वित केल्याची माहिती आहे. त्रुटींची पूर्तता झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाल्यानंतर काही उद्योगांना अटी व शर्तींच्या अधीन राहून पुन्हा उत्पादन सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, नियमभंगाच्या विविध बाबी आढळलेल्या आणखी ४० उद्योगांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संबंधित उद्योगांकडून स्पष्टीकरणे आणि करण्यात आलेल्या उपाययोजनांचे अहवाल मागविण्यात आले असून, त्यांची छाननी केल्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे.
एमपीसीबीच्या कारवाईचे स्वागत होत असले तरी केवळ कारवाई करून प्रश्न सुटणार नसल्याचे पर्यावरणप्रेमी आणि स्थानिकांचे म्हणणे आहे. एखाद्या उद्योगावर उत्पादन बंदी घातल्यानंतर त्याने त्रुटींची पूर्तता करून पुन्हा उत्पादन सुरू केले, तर त्यानंतरही प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे काटेकोर पालन होत आहे की नाही, याची नियमित तपासणी होणे गरजेचे आहे. विशेषतः सांडपाणी प्रक्रिया, घातक रासायनिक कचऱ्याची विल्हेवाट, वायू उत्सर्जन आणि प्रदूषण नियंत्रण यंत्रणांची प्रत्यक्ष कार्यक्षमता यावर सातत्याने लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. अन्यथा कारवाईनंतर काही दिवस परिस्थिती नियंत्रणात येईल आणि त्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सातत्याने कारवाईची गरज
तारापूर एमआयडीसीतील प्रदूषणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. त्यामुळे १२ उद्योगांवरील उत्पादन बंदी आणि ४० उद्योगांना बजावलेल्या नोटिसांकडे केवळ आकडेवारी म्हणून न पाहता, एमपीसीबीने ही कारवाई सातत्यपूर्ण आणि परिणामकारक प्रदूषण नियंत्रण मोहिमेची सुरुवात करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. उद्योगांना विकासाची संधी देतानाच पर्यावरणीय नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई आणि नियमांचे पालन करणाऱ्यांना प्रोत्साहन, अशा दुहेरी भूमिकेतून एमपीसीबीने तारापूर एमआयडीसीवर कायमस्वरूपी नजर ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.