

कर्जत : कर्जत शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रस्तावित तीन उड्डाणपुलाची मागणी करण्यात आली होती. कर्जत चारफाटा-मुरबाड रेल्वे उड्डाणपूल, कर्जत भिसेगाव - शिवाजी महाराज स्मारक उड्डाणपूल, गुंडगे - आकुरले रेल्वे उड्डाणपूल असे हे प्रस्तावित तीन उड्डाणपूल आहेत. त्यापैकी कर्जत-मुरबाड मार्गावरील कर्जत चारफाटा-१००.५९ कोटी रूपये | ६५० मी. | २ मार्गिका तसेच गुंडगे–आकुर्ले मार्गावरील उड्डाणपूल ७९.१४ कोटी रूपये | ६५० मी. या दोन उड्डाण पुलांच्या कामांना हिरवा कंदील मिळाला आहे.
खा. सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या पस्थितीत झालेल्या बैठकीत रेल्वे व संबंधित अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेमुळे कर्जतच्या रेल्वे पूल आणि वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. कर्जत शहराची वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखालील न.पा. सातत्याने पाठपुरावा करत आहे. MRIDC व रेल्वे विभागाकडून १ जुलै 2026 रोजी कर्जत न.प.ला नवीन रेल्वे उड्डाणपुलांसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
१५ जुलै २०२६ रोजी कर्जत न.प.ने तीन उड्डाणपुलांची मागणी केली. रेल्वे विभागाचे अधिकारी आणि कर्जत न.प.चे अधिकारी व अभियंत्यांनी संयुक्तपणे जागेची पाहणी केली. महत्त्वाचे म्हणजे, रेल्वे विभागाने सुचविलेल्या कामांचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून, आवश्यक भूसंपादनाचाही समावेश करण्यात आला आहे.
कर्जत न. प. हद्दीतील भिसेगाव-गुंडगे गावांचा कर्जतशी संपर्क अधिक सुलभ होणार आहे. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यात आधीच १३१ ठिकाणी उड्डाणपूल आणि भुयारी पूल यांना तत्त्वता मान्यता देण्यात आली आहे. रेल्वे विभागाकडून व MRIDC विभागाकडून १/०७/२०२६ रोजी कर्जत न.प.ला पत्रव्यवहार करून कर्जत शहर ट्राफिक मुक्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या उड्डाणपूलांचे प्रस्ताव सादर करण्याची मागणी केली. कर्जत न.प.कडून १५/०७/२०२६ रोजी पत्रव्यवहार करून व प्रस्ताव पाठवून कर्जत शहरामध्ये तीन रेल्वे उड्डाणपूल बांधण्याची मागणी केली.
यानंतर रेल्वे विभागाचे अधिकारी यांनी प्रत्यक्ष येऊन कर्जत न.प. प्रशासनाचे अधिकारी यांच्या समवेत पाहणी करून अंदाजपत्रक तयार करून घेऊन रेल्वे विभागाकडून पहिल्या टप्प्यात कर्जत चारफाटा येथे उड्डाणपूल बांधणे व गुंडगे ते आकुर्ले येथे रेल्वे उड्डाणपूल बांधणे या कामांना मंजुरी देण्यात आलेली असून या उड्डाणपुलांचे बांधकाम प्रत्यक्षात दोन महिन्यात सुरू होणार आहे. उर्वरित भिसेगाव ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक रेल्वे उड्डाणपूलाचे काम अंतिम मंजुरीसाठी असून दुसऱ्या टप्प्यात म्हणजे यावर्षी अखेर ते काम देखील मार्गी लागणार आहे असल्याची माहिती बुधवारी झालेल्या बैठकीनंतर सुधाकर घारे यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
बैठकीत निर्णय
कर्जत–मुरबाड मार्गावरील कर्जत चार फाटा- १०० कोटी रूपये | ६५० मीटर | २ मार्गिका
गुंडगे-आकुर्ले मार्गावरील उड्डाणपूल - ७९ कोटी रूपये | ६५० मीटर