Health Issues In Tarapur
पालघर/बोईसर : आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेली तारापूर एमआयडीसी परिसरातील गावांमध्ये असलेल्या नागरी वस्तीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एमआयडीसी परिसरात असलेल्या सरकारी आरोग्य संस्थांच्या अहवालामध्ये प्रदूषणामुळे श्वसनाचे विकार फुफुसाचे आजार झाल्याचे सांगितले जात आहे. अलीकडेच आरोग्य विभागाने घेतलेल्या आरोग्य शिबिरातून तसेच सरकारी रुग्णालयात झालेल्या नियमित आरोग्य तपासणीमधून ही बाब समोर आली आहे. यामध्ये श्वसनाचे विकार, त्वचेचे विकार, क्षयरोग अशा रुग्णांची तपासणी करण्यात आली, त्यामध्ये क्ष्यरोग, श्वसनाचे विकार व त्वचेचे आजार जडल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण नागरिकांच्या जीवावर बेतले आहे.
भविष्यात हे प्रदूषण असेच सुरू राहिले तर नागरी वस्तीमधील नागरिकांचे आरोग्य आणखीन धोक्यात येईल. प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे प्रशासनाला सांगितल्यानंतर यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाने यावर काम करणे आवश्यक आहे. मात्र तरीही ग्रामपंचायतीमार्फत अशा आस्थापनांना नोटीसा बजावल्या जातील व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल असे सांगण्यात आले.
तारापूर औद्योगिक वसाहतीत अनेक प्रदूषणकारी कारखाने दिवसरात्र धडधडत आहेत. एकीकडे विकास ही संकल्पना राज्य सरकारची असली तरी प्रदूषणामुळे नागरिकांचा भकास होत असल्याचे स्पष्ट होत आहे. याआधी औद्योगिक वसाहतीतील परिघांमध्ये असलेल्या गावांमधील पिण्याच्या पाण्याचे अनेक स्त्रोत दूषित झाले होते. रासायनिक पाणी नमुने तपासणीमध्ये ही बाब समोर आले होते त्यावेळी हे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बंद करण्यात आले होते. या पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांमधील पाणी पिण्यालायक नसल्याने नागरिकांना आजार जडण्याची दाट शक्यता वर्तवली गेली होती.
त्या अनुषंगाने सालवड, पास्थळ, कोलवडे, कुंभवली, बोईसर, परनाळी अशा गावांमध्ये 40 पेक्षा जास्त विंधन विहिरी, विहिरी पिण्यासाठी बंद करण्यात आले होते. त्याआधी आरोग्य विभागामार्फत नागरिकांच्या आरोग्य संदर्भात घेतलेल्या आढावा शिबिरामध्ये महिलांना स्तनाचे कॅन्सर, पुरुषांना घशाचे विकार, त्वचेचे विकार, श्वसनाचे विकार झाल्याचे आढळून आले होते.
आरोग्य शिबिरातून नमुने घेतलेल्या रुग्णांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. या प्रयोगशाळेमध्ये तपासणी करण्यात आलेले नमुने यामध्ये प्रदूषण कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले. विशेषतः वायू प्रदूषणामुळे विकार जडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या प्रदूषणाचा मोठा फटका नागरी वस्तीला बसत आहे.
तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाचा मुद्दा गंभीर बनत चालला आहे. राष्ट्रीय हरित लवादाने प्रदूषणाच्या मुद्द्यावरून औद्योगिक संस्था टिमा हिला कोट्यावधींचा दंड आकारला होता. प्रदूषणकारी कारखाने नियमाना बगल देऊन आजही राजरोसपणे प्रदूषण करत आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळ उपायोजनांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. केमिकल युक्त रासायनिक प्रदूषित सांडपाणी, प्रदूषित धूर यामुळे जल व वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात फोफावत आहे.
गेल्या सहा महिन्याची आकडेवारी पाहिली असता औद्योगिक परिसर व सभोवती असलेल्या गावांचा हवा गुणवत्ता निर्देशांक नेहमी खालावलेलाच राहिलेला आहे. हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार प्रदूषण असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका उद्भवत असतो मात्र हा निर्देशांक सुधारण्यासाठी प्रशासन कुठल्याही प्रकारची उपाययोजना करत असल्याचे दिसून येत नाही. अनेक कारखाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला हाताशी धरून राजरोसपणे प्रदूषण करत आहेत. सांडपाणी व्यवस्थापन फोल ठरले आहे. सांडपाणी नियंत्रण एकात्मिक व्यवस्थापन याकडेही नियंत्रण मंडळाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.
तारापूर एमआयडीसी परिसरामध्ये असलेल्या शासकीय आरोग्य संस्थांनी केलेल्या अहवालात जुलै 24 ते मार्च अखेरपर्यंत वायु प्रदूषणामुळे श्वसन विकार झालेली एक व्यक्ती आढळली. फुफुसाचा आजार असलेल्या दोन व्यक्ती आढळल्या. तर बारा नागरिकांना क्षयरोग असल्याचे निष्पन्न झाले. ही आकडेवारी शासकीय संस्थांमधली असले तरी खाजगी रुग्णालयात उपचार घेणार्यांची संख्या आणखीन जास्त आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासाठी प्रदूषणाचा विषय गंभीर होऊन बसला आहे.