बोईसर : तारापूर औद्योगिक वसाहतीतून संशयास्पदरीत्या वाहतूक होत असलेल्या रासायनिक घनकचऱ्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ट्रकमधील पिंपांमध्ये आढळलेले रसायन घातक असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा घातक कचरा कुठून निर्माण झाला, तो कोणाच्या आदेशाने वाहतूक करण्यात आला आणि त्याची विल्हेवाट नेमकी कुठे लावली जाणार होती, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
७ मे रोजी बेटेगाव पोलीस चौकीजवळ वाहनांची तपासणी सुरू असताना ‘श्री कृष्णा रोडलाईन्स’चा ट्रक पोलिसांनी अडविला. वाहनातील मालासंदर्भातील आवश्यक कागदपत्रांची मागणी केली असता समाधानकारक कागदपत्रे सादर करता न आल्याने पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये सुमारे २०० किलो क्षमतेची ८० ते ९० प्लास्टिकची पिंपे आढळून आली होती. पिंपांमधून उग्र दुर्गंधी येत असल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला.
चौकशीदरम्यान हा माल तारापूर औद्योगिक क्षेत्रातील आरे ड्रग्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड येथून आणल्याची माहिती चालकाने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे यांनी घटनास्थळासह संबंधित उद्योगाची पाहणी केली. पिंपांमधील रासायनिक पदार्थांचे नमुने घेऊन ते मुंबईतील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. तब्बल तीन महिन्यांनंतर प्राप्त झालेल्या अहवालात पिंपांमधील रसायन घातक असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, १३ ऑगस्ट रोजी एमपीसीबीचे उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे यांनी बोईसर पोलिसांना पत्र देऊन संबंधित वाहनचालकाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली आहे. घातक रासायनिक घनकचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने आणि नियमांनुसार करणे आवश्यक असल्याचेही एमपीसीबीने स्पष्ट केले आहे.
घातक रासायनिक कचऱ्याच्या वाहतुकीमागे नेमके कोण? कचरा कुठे नेण्यात येणार होता आणि त्याची विल्हेवाट कोणत्या पद्धतीने होणार होती? या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे अपेक्षित आहे. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर एमपीसीबीने पोलिसांकडे कारवाईची मागणी केल्याने आता या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते, याकडे तारापूर औद्योगिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
उद्योगाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील पर्यावरणीय नियमांच्या पालनासंदर्भात यापूर्वीही प्रश्न उपस्थित झाले आहेत. अशातच आता संबंधित उद्योगातून घातक रासायनिक घनकचऱ्याची वाहतूक झाल्याचे समोर आल्याने उद्योगाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र या प्रकरणात उद्योगाची नेमकी भूमिका काय होती, कचरा वाहतुकीची परवानगी कोणी दिली आणि नियमांचे उल्लंघन झाले आहे का, हे पोलिस व एमपीसीबीच्या तपासातून स्पष्ट होणार आहे.
कचरा कुठे नेला जाणार होता?
ट्रकमध्ये आढळलेल्या घातक रसायनाच्या पार्श्वभूमीवर आता या कचऱ्याच्या अंतिम विल्हेवाटीचा प्रश्न गंभीर बनला आहे. सदर कचरा कोणत्या ठिकाणी नेण्यात येत होता? त्यासाठी अधिकृत परवानगी होती का? वाहतुकीदरम्यान आवश्यक कागदपत्रे का नव्हती? तसेच घातक कचऱ्याच्या वाहतुकीसाठी निर्धारित नियमांचे पालन करण्यात आले होते का, याचा तपास होणे आवश्यक आहे.