पालघर ः देशातील पहिल्या पालघर जिल्ह्यातील तारापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पाच्या दोन्ही अनुभट्ट्यांमधील प्राथमिक पुनर्संचरण लूपच्या पाईपलाईनची बदली करण्याचे काम पूर्ण झाले आहे. तारापूर येथील 160 मेगावॉट क्षमतेची अणुभट्टी 1 मधून तब्बल सहा वर्षांनी पुन्हा वीजउत्पादन सुरु झाले असून अणुभट्टी 2 ने “कोल्ड क्रिटिकॅलिटी“ म्हणजेच शीत क्रांतिकता हा प्रत्यक्षात अणु उत्पादन सुरु होण्यापूर्वीचा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
तारापूर 1 व 2 या अणुभट्टींचे अजूनही किमान 10 वर्ष आयुर्मान शिल्लक असून या अणुभट्टीचे पुनरुज्जीवनाच्या प्रकल्पाला यश मिळाले असून पुढील दहा वर्षाच्या कालावधीसाठी वीज निर्मितीसाठी हे युनिट सज्ज झाले आहे.
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील अणुभट्टी - 1 जानेवारी 2020 आणि अणुभट्टी- 2 जुलै 2020 पासून बंद करून अणुभट्टीचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रकल्प अणुभट्ट्यांमधील रिऍक्टर प्रणालीच्या रिसर्क्युलेशन पाइपिंग लूप अर्थात पुनर्संचरण लूपच्या वाहिनीमध्ये तांत्रिक दोष दिसून आल्याने राबवण्यात आला.
तारापूर युनिट 1 मधून 29 जानेवारी 2026 रोजी वीज उत्पादन सुरू करण्यात आले होते. भारतीय अणुऊर्जा महामंडळाद्वारे करण्यात आलेल्या नूतनीकरणाच्या कामाच्या यशस्वी पूर्ततेनंतर 07 मे रोजी तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या (टीएपीएस) युनिट 2 चा पुनर्प्रारंभ आणि सातत्यपूर्ण कार्यान्वयनाला अणुऊर्जा नियामक परिषदेने मंजुरी दिली आहे.
तारापूर युनिट-1 मध्ये देखील अशाच प्रकारचे नूतनीकरण आणि पुनरावलोकन करण्यात आले होते, त्यानंतर मंडळाने डिसेंबर 2025 च्या अखेर ते पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली होती. सध्यस्थितीत हे युनिट 160 मेगावॉट क्षमतेने कार्यरत आहे. तारापूर अणुऊर्जा केंद्राचे युनिट 1 आणि 2 हे आशियातील पहिल्या व्यावसायिक अणुऊर्जा केंद्रातील दोन्ही अणुभट्टीचे पुनरुज्जीवन करण्याचा सुमारे 500 कोटी रुपयांचा खर्च असणारा हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आला आहे.
अणुऊर्जा नियामक परिषदेने आपल्या बहुस्तरीय सुरक्षा पुनरावलोकन प्रक्रियेद्वारे तारापूर युनिट-2 चे नूतनीकरण, सुरक्षासंबंधी सुधारणा आणि तपासणीशी संबंधित निकालांचा आढावा घेतला. अणुऊर्जा नियामक परिषदच्या मंडळाने 6 मे रोजी नूतनीकरण, सुरक्षासंबंधी सुधारणा आणि सविस्तर पुनरावलोकनांची दखल घेत युनिट पुन्हा सुरू करायला आणि पुढील 10 वर्षांच्या कालावधीसाठी कार्यरत ठेवायला सहमती दर्शवली.
अणुभट्टी 2 चे काम पूर्ण झाले असून अणुऊर्जा उत्पादन पूर्वीचा “कोल्ड क्रिटिकॅलिटी” अर्थात शीत क्रांतिकता टप्पा गाठला आहे. या युनिट (2) शी संबंधित टरबाईनच्या संदर्भातील काही कामे पूर्ण होण्याच्या स्थितीमध्ये असून या अणुभट्टी मधून लवकरच वीज उत्पादन सुरु होणार असल्याचे कळते.
तारापूर अणुऊर्जा केंद्राची युनिट 1 आणि 2 या बॉइलिंग वॉटर रिॲक्टर (बीडब्ल्यूआर) रचनेवर आधारित भारताच्या पहिल्या अणुभट्ट्या असून त्यांचे व्यावसायिक कामकाज 1969 मध्ये सुरू झाले होते. या नूतनीकरणाच्या कामात रिॲक्टर कुलंट रिक्र्युलेशन पाइपिंगच्या जागी प्रगत गंज-रोधक स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले फॉर्ज्ड पाइपिंग बसवण्यात आले असून जोडण्या पूर्णपणे बदलण्यात आल्या आहेत.
इतर सुरक्षा सुधारणांमध्ये रिॲक्टर कंटेनमेंट फिल्टर्ड व्हेंटिंग व्यवस्था आणि पर्यायी जलशीतक व्यवस्था इत्यादी कार्यान्वित करण्याचा समावेश आहे. शिवाय, सध्याच्या देखभाल कालावधीत रिॲक्टर प्रेशर व्हेसल वेल्ड्ससारख्या महत्त्वपूर्ण घटकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे अणुभट्टीच्या आयुर्मानाचे आणि उर्वरित आयुष्याचे मूल्यांकन करता येईल.