Tansa River Bridge Repair Pudhari
पालघर

Tansa River Bridge Repair: तानसावरील जुना पूल दुरुस्ती कुर्मगतीने; चार महिन्यांपासून मार्ग बंद

नागरिक त्रस्त, वाहतुकीसाठी रस्त्याचा महत्त्वाचा दुवा ठप्प

पुढारी वृत्तसेवा

खानिवडे: मुंबईला गुजरात तसेच उत्तर भारताशी जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील खानिवडे येथील तानसा नदीवरील ६५ वर्षे जुन्या पुलाच्या दुरुस्तीचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या चार महिन्यांपासून या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्याने कशीद, कोपर, खराटतारा आणि खानिवडे परिसरातील नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे.

पूर्वीचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ आणि सध्याचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ यावरील हा पूल आज सेवा रस्त्याचा भाग बनला असला, तरी स्थानिक गावांसाठी तो महत्त्वाचा दळणवळणाचा दुवा आहे. पुलावरील वाहतूक बंद झाल्याने नागरिकांना मुख्य महामार्गाच्या वेगवान वाहतुकीतून मार्ग काढावा लागत असून हा प्रवास धोकादायक ठरत आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या तपासणीत पुलाच्या खालच्या बाजूचे प्लास्टर कोसळल्याने बांधकामातील लोखंडी सळ्या उघड्या पडल्याचे तसेच काही गर्डरला तडे गेल्याचे निदर्शनास आले होते. पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने तातडीने वाहतूक बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.

१९६० च्या दशकात उभारण्यात आलेला हा पूल त्या काळातील विकासाचा मैलाचा दगड ठरला होता. या पुलामुळे तानसा खाडीपलीकडील दुर्गम भागाचा वसई, मुंबई आणि गुजरातशी थेट संपर्क प्रस्थापित झाला. परिणामी शिक्षण, रोजगार, व्यापार आणि दळणवळणाच्या संधी वाढून संपूर्ण परिसराच्या विकासाला चालना मिळाली होती.

कामात होणाऱ्या विलंबाबाबत बोलताना प्रत्यक्ष कामगारांनी सांगितले की, तानसा खाडीतील भरती-ओहोटी, दलदलीचा भाग, सतत बदलणारा पाण्याचा प्रवाह आणि पुलाची उंची यामुळे बांबूंचे परे उभारणे तसेच पुलाखाली काम करणे अत्यंत कठीण ठरत आहे. गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने कराव्या लागणाऱ्या दुरुस्तीमुळे कामाचा वेग मंदावला आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी सुहास चिटणीस यांनी सांगितले की, “मुंबई-दिल्ली महामार्गावरील अनेक जुने पूल आजही वापरात आहेत. त्यांच्या सुरक्षिततेची नियमित तपासणी करून आवश्यक तेथे दुरुस्ती केली जात आहे. खानिवडे येथील तानसा पुलाच्या दुरुस्तीचे कामही त्याचाच एक भाग असून सुरक्षिततेला प्राधान्य देत काम सुरू आहे.”

दरम्यान, दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण करून हा महत्त्वाचा मार्ग वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. पुलाचा ऐतिहासिक वारसा आणि स्थानिकांच्या दैनंदिन जीवनातील महत्त्व लक्षात घेता प्रशासनाने कामाच्या गतीकडे विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

सहा दशकापूर्वीचा पूल कमकुवत

सहा दशकांहून अधिक काळ सातत्याने वाहतुकीचा भार सहन केल्यानंतर पुलाच्या संरचनेवर परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले आहे. भविष्यात कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी सखोल तांत्रिक तपासणीनंतर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असले तरी कामाच्या गतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT