तांदुळवाडी किल्ला 
पालघर

Palghar Tandulwadi Fort | तांदुळवाडी किल्ला निसर्ग, इतिहास, संस्कृतीचा संगम

दिवसेंदिवस किल्ल्याची मात्र होतेय दुरवस्था

पुढारी वृत्तसेवा

केळवा : विजय घरत

सह्याद्रीच्या कुशीत दडलेले गडकिल्ले म्हणजे महाराष्ट्राच्या पराक्रमाचे आणि दैदिप्यमान इतिहासाचे जिवंत साक्षीदार आहेत. असाच एक ऐतिहासिक, नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारा गिरीदुर्ग म्हणजे पालघर जिल्ह्यातील सफाळे गावाजवळ असलेला 'तांद-ळवाडी किल्ला'. समुद्रसपाटीपासून सुमारे ५७९ मीटर उंचीवर असलेला हा किल्ला गिर्यारोहक, निसर्गप्रेमी आणि इतिहासप्रेमींसाठी एक उत्तम आकर्षण केंद्र बनला आहे.

ऐतिहासिक पार्श्वभूमीचा विचार करता तांदुळवाडी किल्ला इतिहास सुमारे १५ व्या शतकातील (साधा-रणतः १४२९ चा) मानला जातो. या किल्ल्याची उभारणी गुजरातच्या सुलतानशाहीच्या काळात झाली. भौगोलिकदृष्ट्या मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे पुढे हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला. १८ व्याशतकात मराठा साम्राज्याच्या विस्तार काळात, इ.स. १७३७ मध्ये थोरले बाजीराव पेशवे यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांविरुद्ध मोहीम उघडली. या पराक्रमी मोहिमेदरम्यान मराठ्यांनी हा किल्ला पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला आणि तो मराठा साम्राज्यात सामील केला.

त्यावेळी या किल्ल्याचा वापर वैतरणा आणि सूर्या नद्यांच्या संगमावर, तसेच सागरी मार्गावर नजर ठेवण्यासाठी निरीक्षण बुरुज म्हणून मुख्यत्वे वापर केला जात होता. भौगोलिक दृष्ट्या हा किल्ला सफाळे रेल्वे स्थानकापासून पूर्वेला अवघ्या ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या तांदुळवाडी गावाच्या पाठीशी उभा आहे. येथील हवामान ऋतूनुसार निसर्गाचे वेगवेगळे रंग दाखवते. पावसाळ्यात हा परिसर मुसळधार पाऊस अनुभव देतो आणि संपूर्ण डोंगर रांगा हिरवाईची शाल पांघरतात. उन्हाळ्यात येथील हवामान अत्यंत उष्ण आणि कोरडे असते, तर हिवाळ्यात दाट धुके आणि शीतल, आल्हाददायक वातावरण पर्यटक, गिर्यारोहक यांना आकर्षित करते. आरोग्यदायी असा रानभाज्यांचा खजिना पावसाळ्याच्या दिवसांत तांदुळवाडीच्या डोंगरात आणि जंगलात मोठ्या प्रमाणावर दुर्मिळ रानभाज्या उगवतात.

स्थानिक आदिवासी बांधवांना या वनस्पतींचे पारंपरिक ज्ञान आहे. करडू, शेवळी, कंटोल, यांसारख्या अनेक रानभाज्या येथे मिळतात. या नैसर्गिक भाज्या केवळ चवदार नसून पोटाचे विकार आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत गुणकारी मानल्या जातात. लोकजीवन आणि संस्कृतीचा विचार करता, किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये कुणबी समाज आणि आदिवासी समाज पिढ्यानपिढ्या गुण्यागोविंदाने राहत आहेत. शेती आणि जंगलातील साधनसंपत्तीवर त्यांचे जीवन अवलंबून आहे.

आधु-निकतेच्या काळातही या समाजाने आपली संस्कृती जिवंत ठेवली आहे. आदिवासी संस्कृतीचे वैभव असलेले 'तारपा नृत्य' आणि जागतिक स्तरावर नावाजलेली 'वारली रंगकला' येथे जवळून पाहायला मिळते. एकीकडे निसर्गाचे अद्भुत वरदान आणि चिमाजी अप्पांच्या शौर्याचा वारसा लाभलेला हा किल्ला आज मात्र अत्यंत दुर्गम आणि दयनीय अवस्थेत पोहोचला आहे.

परिसरात दुर्मीळ औषधी वनस्पती

तांदुळवाडी किल्ल्याची चढाई 'मध्यम' स्वरूपाची आहे. पायथ्यापासून गडावर पोहोचण्यासाठी साधारण २ ते ३ तास लागतात. चढाईचा सुरुवातीचा टप्पा सोपा असला, तरी शेवटचा ४५ मिनिटांचा टप्पा तीव्र चढावाचा आणि रोमांचक आहे. गडावर पोहोचल्यावर इतिहासाच्या खाणाखुणा पाहायला मिळतात. यामध्ये पाण्याचे जुने दगडी हौद, एक छोटा पाण्याचा तलाव आणि प्राचीन तटबंदीचे अवशेष समाविष्ट आहेत. याशिवाय, हा डोंगर परिसर विविध पक्षी आणि दुर्मिळ औषधी वनस्पतींनी नटलेला आहे. गडावरून खाली दिसणारा वैतरणा-सूर्या नदीचा संगम आणि आजूबाजूचा विहंगम परिसर डोळ्यांचे पारणे फेडतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT