Talasari Water Conservation pudhari photo
पालघर

Palghar Water Scarcity : लोकसहभागातून तलासरी तालुका होणार जलसमृद्ध

२१ ग्रामपंचायतींमध्ये १२२ वनराई बंधारे पूर्ण, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज

पुढारी वृत्तसेवा

तलासरी : सुरेश वळवी

तलासरी तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी तसेच पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या संकल्पनेतून आणि तलासरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. वैभव सापळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात पाणी अडवा, पाणी जिरवा ही विशेष जलसंधारण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेला मोठे यश मिळत असून, तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींमध्ये आतापर्यंत तब्बल १२२ वनराई बंधाऱ्यांची उभारणी पूर्ण झाली आहे. तर काही ठिकाणी काम सुरू आहे.

पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी स्थानिक पातळीवर अडवून साठा निर्माण करणे आणि भूजल पातळी वाढवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तालुक्यातील ओढे, नाले आणि नदीच्या लहान-मोठ्या प्रवाहांवर हे वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांमुळे पाणी जमिनीत मुरण्यास मोठी मदत होत असून, परिसरातील विहिरी आणि हँडपंप यांच्या पाणी पातळीत निश्चितच वाढ होणार आहे.

परिणामी, आगामी काळात शेती सिंचनासाठी आणि पशुधनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पाणी बचत ही सामूहिक जबाबदारी

पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून पाण्याचे संवर्धन हीच उज्ज्वल भविष्याची तरतूद आहे. या भावनेतून ही योजना लोकचळवळ बनली आहे. ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, ग्रामस्थ, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या एकत्रित प्रयत्नांतून आणि श्रमदानातून हे बंधारे साकारले आहेत. पाण्याची काटकसर करणे, त्याचा योग्य वापर करणे आणि प्रत्येक जलस्रोताचे रक्षण करणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. आज आपण पाण्याचे संवर्धन केले, तर उद्या पाणी आपले संवर्धन करेल, असा संदेश देत लोकसहभागातून तलासरी तालुका जलसमृद्ध करण्याचा निर्धार प्रशासनाने आणि ग्रामस्थांनी घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT