तलासरी : ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावाजवळच आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून सुसज्ज आरोग्य केंद्रांच्या इमारती उभारल्या जात असताना तलासरी तालुक्यातील सूत्रकार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत मात्र नियोजनाच्या अभावामुळे पडीक पडल्याचे चित्र आहे. मुख्य रस्त्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर आणि गावापासूनही दूर असलेल्या या इमारतीपर्यंत जाण्यासाठी आजही वाहनांचा रस्ता उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्ण, आरोग्य कर्मचारी आणि रुग्णवाहिका या केंद्रापर्यंत पोहोचणार कसे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
सूत्रकार येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी करोडो रुपयांचा खर्च करून नवीन इमारत बांधण्यात आली आहे. मात्र या इमारतीपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने नागरिकांना शेताच्या बांधावरून पायवाटेने जावे लागते. इमारत गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर निर्जन ठिकाणी उभारण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रासाठी इमारत बांधण्यापूर्वी त्या ठिकाणी रस्ता, वाहतुकीची सुविधा आणि रुग्णांना सहज पोहोचता येईल का, याचा विचार करण्यात आला होता का, असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे, इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर १५ ऑगस्ट २०२४ रोजी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण तसेच जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाल्याचा फलक या ठिकाणी लावण्यात आला आहे. मात्र उद्घाटन होऊन दोन वर्षांच्या जवळपास कालावधी उलटत असतानाही ही इमारत प्रत्यक्ष आरोग्य सेवेसाठी वापरात आलेली नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
सध्या इमारतीची अवस्था पाहता ती पूर्णपणे उघडी आणि पडीक असल्याचे दिसून येते. इमारतीमध्ये बसविण्यात आलेले पंखे, इलेक्ट्रिक वायरिंग आणि अन्य साहित्य चोरीला गेल्याचे दिसत आहे. इलेक्ट्रिक वायरिंगसाठी बसविण्यात आलेल्या पट्ट्याही उखडून काढण्यात आल्या आहेत. शौचालयातील साहित्याचीही तोडफोड झाल्याचे निदर्शनास येत आहे. कोट्यवधींचा सार्वजनिक निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या इमारतीच्या सुरक्षेसाठी कोणतीही ठोस व्यवस्था करण्यात आली नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
इमारतीच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने नवीन इमारत आणि त्यातील साहित्य वाऱ्यावर सोडण्यात आल्यासारखी स्थिती आहे. आरोग्य सेवा सुरू करण्याआधीच इमारतीची तोडफोड आणि साहित्याची चोरी होत असेल, तर भविष्यात ही इमारत वापरात आणताना शासनाला पुन्हा मोठा खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे इमारत बांधताना नियोजन कोणी केले, जागेची निवड कोणत्या निकषांवर झाली, रस्त्याची तरतूद का करण्यात आली नाही आणि इमारत पूर्ण झाल्यानंतर तिची देखभाल व सुरक्षा का करण्यात आली नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
ग्रामीण आणि आदिवासी भागात आरोग्य सेवा आधीच अनेक अडचणींना सामोरी जात असताना रुग्णांच्या सोयीपेक्षा केवळ इमारत उभारण्याला प्राधान्य देण्यात आले का, असा सवालही उपस्थित होत आहे. तलासरी तालुक्यात शासनाच्या आरोग्य व्यवस्थेत ग्रामीण रुग्णालय, चार प्राथमिक आरोग्य केंद्रे, २८ उपकेंद्रे आणि आरोग्य पथकांची नोंद आहे. अशा परिस्थितीत नवीन आरोग्य केंद्राची इमारत प्रत्यक्षात नागरिकांच्या उपयोगात येणे अपेक्षित असताना रस्त्याअभावी ती बंद किंवा पडीक राहणे हा सार्वजनिक निधीच्या वापराबाबत गंभीर प्रश्न ठरतो.
रस्ता उपलब्ध नसताना एवढा मोठा खर्च करून आरोग्य केंद्राची इमारत उभारण्यामागे नेमके नियोजन काय होते, याची चौकशी करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. संबंधित विभागाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून इमारतीपर्यंत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा, चोरी व तोडफोडीची चौकशी करावी, तसेच चोरी झालेल्या साहित्याच्या प्रकरणी अधिकारी अज्ञात वक्तींवर गुन्हे नोंद करतील का ? इमारतीच्या सुरक्षेची व्यवस्था करावी आणि आरोग्य केंद्र प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.