तलासरी : वर्ल्डवाइड व्हेटरिनरी सर्व्हिस इंडिया यांच्या मिशन रेबीज उपक्रमांतर्गत तलासरी येथे रेबीज प्रतिबंध मोहिम राबविण्यात आली. तलासरी नगर पंचायत हद्दीत दोन दिवस राबविण्यात आलेल्या सालीकरण मोहिमेत 183 कुत्र्यांचे यशस्वी लसीकरण पूर्ण करण्यात आले. शासन यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, आंतरराष्ट्रीय संस्थांचे तज्ज्ञ मार्गदर्शन आणि स्थानिक समुदाय यांच्या एकत्रित सहकार्यामुळे रेबीजसारख्या पूर्णपणे प्रतिबंध करता येणाऱ्या तरीही गंभीर आजारावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्याची क्षमता वाढत आहे. या मोहिमेत सर्व कुत्र्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरक्षित व परिणामकारक मानली जाणारी नॉबिवॅक अँटी रेबीज लस देण्यात आली.
तलासरीत पशु वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोजेक्ट लीड डॉक्टर अश्विन सुशील रेबीज मिशन मुंबई यांच्या सहकार्याने रेबीज लसीकरण मोहीम राबविण्यात आले. लसीकरण मोहिमेत 8 सदस्य समाविष्ट होते. त्यामध्ये एक डॉक्टर, एक सुपरवायझर एक चालक पाच स्वान पकडणारया प्रशिक्षित आणि समर्पित पथकाद्वारे राबविण्यात आले. तलासरी नगर पंचायत हद्दीत सुतारपाडा, चरनीय टॉवर, केके नगर, पाटीलपाडा, विकासपाडा हाडळपाडा व पारस पाडा या भागातील भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले. तसेच तालुक्यातील इतर भागात सर्व्हेलन्स मॅनेजर राज गुप्ता, व्हेटरिनरी असिस्टंट ज्ञानेश्वर यांच्या पथकामार्फत विविध गावांमध्ये सुरक्षित कुत्रा हाताळणी, अचूक माहिती नोंदणी आणि आंतरराष्ट्रीय जैवसुरक्षा मानकांचे काटेकोर पालन सुनिश्चित करत नियोजनबद्धरीत्या काम करण्यात आले.
भारताला 2030 पर्यंत रेबीजमुक्त करण्याचा मानस
मिशन रेबीज हा वर्ल्डवाइड व्हेटरिनरी सर्व्हिसचा जागतिक उपक्रम असून, कुत्र्यांमुळे होणाऱ्या मानवी रेबीजचा संपूर्ण नायनाट करणे हे त्याचे मुख्य ध्येय आहे. शासन, स्थानिक प्रशासन आणि समुदाय यांच्या सहकार्याने शाश्वत रेबीज नियंत्रण मॉडेल तयार करण्यासाठी हा उपक्रम कार्यरत आहे. भारताला 2030 पर्यंत रेबीजमुक्त करण्यासाठी वर्ल्डवाइड व्हेटरिनरी सर्व्हिसचा आणि मिशन रेबीज वैज्ञानिक, मानवी आणि सहकार्यात्मक दृष्टीकोनातून सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहेत. तलासरी येथील यशस्वी मोहीम हा या राष्ट्रीय ध्येयाच्या दिशेने उचललेला एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे.