तलासरीतील अंगणवाडीच्या दुरवस्थेमुळे बालआरोग्य धोक्यात pudhari photo
पालघर

Talasari Anganwadi condition : तलासरीतील अंगणवाडीच्या दुरवस्थेमुळे बालआरोग्य धोक्यात

परिसरात सांडपाण्याने दुर्गंधी, पालकांमध्ये संताप

पुढारी वृत्तसेवा

तलासरी : उधवा गावठणपाडा येथील अंगणवाडी केंद्रात अस्वच्छतेचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अंगणवाडीच्या आवारात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून आली. पाण्याच्या पाईपलाईन मध्ये गळती असून सांडपाणी मोकळ्या जागेत साचत असल्याचे आढळले.

अंगणातच सांडपाणी सोडले जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमुळे लहान मुलांच्या आरोग्याशी थेट खेळ होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो, अशी भीतीही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

अंगणवाडीसाठी पाण्याचा शोषखड्डा तयार करण्यात आला असला तरी त्यामध्ये घाणीचे साम्राज्य असल्याचे दिसून आले. स्वयंपाकघरातील पाईप पूर्णतः तुटलेला असून तात्पुरत्या ‌‘जुगाड‌’ स्वरूपात तुटलेल्या सिमेंट पत्र्याने पानी बाहेर सोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही आढळले. ही अवस्था अत्यंत दयनीय व धोकादायक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.

एकीकडे जिल्हा परिषद पालघर यांच्या वतीने “स्वच्छ सुंदर परिसर, जीवन निरोगी निरंतर” अशी घोषवाक्ये दिली जात असताना, प्रत्यक्षात अंगणवाडीतील परिस्थिती या घोषणांना हरताळ फासणारी असल्याचे चित्र आहे.

विशेष म्हणजे संबंधित अंगणवाडी केंद्रापासून अवघ्या पाच ते दहा मीटर अंतरावर ग्रामपंचायत कार्यालय आहे. तरी देखील इतक्या जवळ असलेल्या शासकीय यंत्रणेकडून दुर्लक्ष कसे झाले, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. अंगणवाडीच्या अंगणात सांडपाणी मोकळ्यावर सोडले जात असेल किंवा अशीच अस्वच्छता कायम राहिली, तर लहान मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून ग्रामपंचायतीने याबाबत तातडीने लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी तसेच अंगणवाडीची परिस्थिती त्वरित सुधारावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

अंगणवाडी परिसर अस्वच्छ असून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरलेली आहे. पाईपलाईन लिकेजमुळे पटांगणात पाणी साचत असून त्यामुळे डासांची उत्पत्ती व संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे. येथे लहान मुले शिक्षण घेत असल्याने त्यांच्या आरोग्याची गंभीर चिंता निर्माण झाली आहे. या सर्व बाबींवर ग्रामपंचायतीने तात्काळ लक्ष देऊन आवश्यक ती कारवाई करणे अत्यावश्यक आहे.
देवराम कुरकुटे, ग्रामस्थ
या प्रकरणाबाबत मला अद्याप सविस्तर माहिती मिळालेली नाही. मी तत्काळ ग्रामसेवकांकडून माहिती घेऊन वस्तुस्थितीची पडताळणी करणार आहे. आवश्यक ती चौकशी करून संबंधित अंगणवाडीतील त्रुटी दूर करण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल. कृपया एक आठवड्याचा अवधी द्यावा; त्या कालावधीत संपूर्ण दुरुस्ती व स्वच्छतेची कामे पूर्ण करून परिस्थिती सुधारण्यात येईल.
रूपाली राणा, बालविकास अधिकारी, तलासरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT