वीवा स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या ९२ विद्यार्थ्यांनी भेट दिली 
पालघर

Students study historic Nirmal Shankaracharya Temple architecture- ऐतिहासिक निर्मळ शंकराचार्य मंदिराच्या स्थापत्यशास्त्राचा विद्यार्थ्यांकडून अभ्यास

वीवा स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या ९२ विद्यार्थ्यांची ऐतिहासिक वास्तूला भेट

पुढारी वृत्तसेवा

खानिवडे : पुढारी वृत्तसेवा

वसई तालुक्यातील निर्मळ येथील पेशवेकालीन ऐतिहासिक श्री शंकराचार्य मंदिराच्या स्थापत्य-शास्त्राचा सखोल अभ्यास करण्यासाठी वीवा स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या ९२ विद्यार्थ्यांनी विशेष अभ्यासभेट दिली. या उपक्र-मातून विद्यार्थ्यांनी मंदिराची वास्तुरचना, शिल्पकला, ऐतिहासिक संदर्भ आणि पुरातत्त्वीय वैशिष्ट्यांची माहिती घेतली. ऐतिहासिक वास्तूंचे स्थापत्यशास्त्रीय दस्तऐवजीकरण आणि त्यांच्या संवर्धनासाठी आवश्यक नोंदी संकलित करण्याच्या दृष्टीने ही अभ्यासभेट महत्त्वपूर्ण ठरली.

गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी कार्तिक शुक्ल नवमीच्या मुहूर्तावर आयोजित या इतिहास मार्गदर्शन भटकंतीत वीवा स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या बॅचलर ऑफ आर्किटेक्चर विभागातील विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी झाले होते. सकाळी ८.३० ते ११ या वेळेत झालेल्या या अभ्यास सत्रात मोडी लिपी अभ्यासक व इतिहास संशोधकांनी विद्यार्थ्यांना निर्मळ-विमल प्रांताच्या प्राचीन तसेच पेशवे-कालीन इतिहासाची पुराव्यांसह माहिती दिली.

यावेळी निर्मळची पौराणिक पार्श्वभूमी, उपलब्ध मोडी कागदपत्रे, वास्तुशास्त्रीय वैशिष्ट्ये, शिलालेख, मंदिराचे शिल्पवैभव, मूर्तीस्थापत्य, ब्रिटिशकालीन नकाशे, परिसरातील प्राचीन मूर्ती व मंदिरे, निर्मळ माहात्म्य, ऐतिहासिक आख्यायिका आणि काळाच्या ओघात लोप पावलेले संदर्भ अशा विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. इसवी सन १७३९ मध्ये मंदिराची उभारणी करताना सहभागी असलेला कामगार वर्ग, मंदिराची देखभाल करणारे घटक तसेच मूळ मंदिराची उभारणी आणि त्यानंतर झालेली पुनर्बाधणी याविषयीही महत्त्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. इतिहास अभ्यासक कल्पना राऊत यांनी पुराणे, ऐतिहासिक कथा आणि उपलब्ध दस्तऐवजांचा अभ्यास करण्याच्या पद्धती विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या.

मंदिराच्या इतिहासाचे लेखन, आचार्य स्वामी यांच्याविषयी आवश्यक संशोधन आणि प्रत्यक्ष वास्तूचे निरीक्षण करताना पुरातत्त्वीय नोंदींचा आधार घेण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. केवळ ऐकीव माहितीवर अवलंबून न राहता ऐतिहासिक पुरावे, वास्तूची प्रत्यक्ष रचना आणि उपलब्ध संदर्भ यांची सांगड घालून अभ्यास कसा करावा, याचेही मार्गदर्शन करण्यात आले.

वसई-विरार परिसरातील पुरातन वास्तूंची रचना समजून घेणे, त्यांचे रेखाटन व तांत्रिक आरेखन करणे, स्थापत्यशास्त्रीय अभिलेखन तयार करून त्याचे प्रकाशन करणे, तसेच ऐतिहासिक वास्तूंच्या संव-र्धनासाठी संकलित माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा या अभ्यास मोहिमेचा प्रमुख उद्देश होता. या माध्यमातून स्थानिक ऐतिहासिक वारशाचे शास्त्रीय दस्तऐवजीकरण होऊन भविष्यातील संवर्धनाच्या प्रयत्नांना दिशा मिळू शकते. या उपक्रमाच्या नियोजनात प्राचार्य प्रो. नयना राऊत, शैक्षणिक समन्वयक प्रो. विनिता कोल्हे, प्रा. वेदांत महाजन, आणि प्रा. जिगर पटेल यांनी सक्रिय योगदान दिले.

ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी शास्त्रीय अभ्यासाची जोड निर्मळ येथील पेशवेकालीन शंकराचार्य मंदिरासारख्या ऐतिहासिक वास्तूंचा अभ्यास केवळ इतिहास जाणून घेण्यापुरता मर्यादित नसून, त्यांच्या स्थापत्यवैशिष्ट्यांची शास्त्रीय नोंद करून भविष्यातील संवर्धनासाठी आधार निर्माण करण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. वास्तुकलेच्या विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमातून स्थानिक ऐतिहासिक वारशाकडे अभ्यासपूर्ण दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT