Speeding Car Burns
डहाणू : डहाणू-बोर्डी प्रमुख राज्य मार्गावर नरपड व चिखले गावाच्या हद्दीत रविवारी रात्री सव्वा बारा वाजता एक धावती कार अचानक पेटली. कारमध्ये पाच प्रवासी होते. मात्र चालकाची प्रसंगावधान राखण्याची तयारी आणि प्रवाशांची सतर्कता यामुळे सर्वजण वेळेवर बाहेर पडले आणि सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही क्षणांत संपूर्ण कार जळून खाक झाली.
ही कार गुजरातच्या उंबरगावहून डहाणूकडे परतणाऱ्या प्रवाशांची होती. घटनेची माहिती मिळताच डहाणू पोलीस ठाण्याच्या रात्रीच्या गस्ती पथकाला सतर्क करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक आनंदराव पवार आणि परमेश्वर जाधव हे आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांना नरपड व चिखले गावातील स्थानिकांनी मदतीचा हात दिला.
डहाणू नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि पाऊण तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. त्यानंतर जळालेलं वाहन रस्त्याच्या बाजूला हलवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
सदर कार ही पेट्रोलवर चालणारी असून, प्राथमिक तपासात तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही घटना ऐन रात्रीच्या वेळेस घडूनही वेळीच कारमधून बाहेर पडल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.