Sparrow Conservation Dahanu Pudhari
पालघर

Sparrow Conservation Dahanu: डहाणूतील शाळांमध्ये चिमण्यांचा किलबिलाट; संवर्धनाचा अनोखा उपक्रम यशस्वी

३० घरट्यांमुळे चिमण्यांचे पुनरागमन; विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागरूकता वाढली

पुढारी वृत्तसेवा

डहाणू : डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा टोकेपाडा (घोलवड) आणि लिलकपाडा (कोसबाड) येथे चिमणी संवर्धनाचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला असून, या उपक्रमामुळे शाळांच्या परिसरात पुन्हा एकदा चिमण्यांचा गोड किलबिलाट ऐकू येत आहे. पेन्स फाउंडेशनच्या माध्यमातून पर्यावरणप्रेमी शिक्षक दिपक देसले यांनी हा उपक्रम राबवला असून, स्थानिक स्तरावर त्याचे कौतुक होत आहे.

या उपक्रमांतर्गत योगेश सावे यांच्या पुढाकारातून टोकेपाडा येथे 20 आणि लिलकपाडा (कोसबाड) येथील शाळेत 10 अशा एकूण 30 चिमण्यांची घरटी बसवण्यात आली आहेत. या घरट्यांमध्ये चिमण्यांनी वास्तव्यास सुरुवात करत शेकडो पिलांना जन्म दिला आहे. त्यामुळे शाळांच्या परिसरात मुलांच्या आवाजा बरोबरच चिमण्यांचाही किलबिलाट ऐकू येत असून, वातावरण अधिक आनंददायी व नैसर्गिक झाले आहे, अशी माहिती दिपक देसले यांनी दिली.

चिमण्या आणि इतर पक्षी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. कीटक नियंत्रण, परागीभवन आणि बीज प्रसार या प्रक्रियांमध्ये त्यांचा मोठा वाटा असतो. मात्र, वाढते शहरीकरण, झाडांची तोड आणि बदलती जीवनशैली यामुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने घटत आहे. त्यामुळे अशा संवर्धन उपक्रमांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवत आहे. लिलकपाडा (कोसबाड) येथील शाळेत दोन वर्षांपूर्वी बसवलेल्या घरट्यांमध्ये आजही चिमण्या व त्यांच्या पिलांचा किलबिलाट सुरू असल्याचे दिसून येते. या उपक्रमामुळे केवळ चिमण्यांचे संरक्षण होत नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणा विषयी जागरूकताही निर्माण होत आहे. पक्षी वाचले पाहिजेत हा संदेश देणारा हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासाठी दिशादर्शक ठरत असून, समाजानेही अशा उपक्रमांत सक्रिय सहभाग घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. लवकरच लिलकपाडा (कोसबाड) शाळेत मधाच्या पेट्याही बसवण्याचे नियोजन असल्याचे शिक्षक दिपक देसले यांनी सांगितले.

चिमणी संवर्धन, प्लास्टिक संकलन केंद्र, कासव संवर्धन आदी विविध उपक्रम सीडबॉल मॅन म्हणून ओळखले जाणारे शिक्षक दिपक देसले सातत्याने राबवत आहेत. त्यामुळे कोसबाड येथील लिलकपाडा शाळेला पर्यावरण शाळा म्हणून ओळख मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT