पालघर : पुढारी वृत्तसेवा
पालघर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवत शिंदे गटाचे माजी आमदार श्रीनिवास वनगा यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. वनगा यांच्या या पुनरागमनामुळे पालघरमध्ये शिंदे गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात असून, आगामी काळातील राजकीय समीकरणांबाबत चर्चाना उधाण आले आहे.
खासदार क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालघरमध्ये आले असताना श्रीनिवास वनगा यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. पक्षप्रवेशानंतर आपली भूमिका स्पष्ट करताना वनगा म्हणाले की, काही वर्षांपूर्वी घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे आपण भरकटलो होतो. मात्र, परिवार आणि कार्यकर्त्यांची इच्छा आपण पुन्हा स्वगृही परतावे, अशी होती. त्यामुळे भाजपमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. आज कै. माजी खासदार चिंतामण वनगा हयात असते, तर आपल्या या निर्णयाने त्यांना नक्कीच आनंद झाला असता, अशी भावनिक प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे, कोणत्याही पदाची किंवा राजकीय लाभाची अपेक्षा नसून भाजपमध्ये सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या कामाचे कौतुक करत भाजपच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पालघरच्या राजकारणात नव्या समीकरणाची नांदी
जानेवारी २०१८ मध्ये तत्कालीन खासदार अॅड. चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर मे २०१८ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी नाकारली होती. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात आल्याने वनगा कुटुंब नाराज झाले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून पोटनिवडणूक लढवली; मात्र त्यात त्यांचा पराभव झाला.
पुढे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने त्यांना पालघरमधून उमेदवारी दिली आणि ते आमदार म्हणून निवडून आले. एकनाथ शिंदे यांच्या बंडावेळी वनगा यांनी शिंदे यांची साथ दिली होती. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांची उमेदवारी नाकारून भाजप मधून आयात करून माजी खासदार राजेंद्र गावित यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली. नाराज झालेले वनगा घरातून गायब झाले होते. नंतर वनगा यांनी एकनाथ शिंदे यांच्या शब्दाला मान देत त्यांनी शिंदे गटातच राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केल्याने पालघरच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी झाली आहे. वनगा यांच्या पक्षांतराचा शिंदे गटाच्या संघटनात्मक ताकदीवर आणि आगामी राजकीय वाटचालीवर किती परिणाम होणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.