Palghar Shiv Sena Leadership Issues
पालघर: जिल्ह्यातील बोईसर विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसेनेचा आदिवासी समाज विभाग व आधार प्रतिष्ठान मार्फत आयोजित करण्यात आलेल्या भव्य सामूहिक विवाह सोहळ्यात पुन्हा एकदा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची नाराजी समोर आली. त्यामुळे शिवसेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले. या कार्यक्रमाला शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित असले तरी बोईसर विधानसभा क्षेत्रातील अनेक पदाधिकाऱ्यांनी नाराजी दर्शवत या कार्यक्रमाला गैरहजेरी लावली.
शिवसेना व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बोईसर शहरात सर्कस मैदान येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पक्ष म्हणून बोईसर विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावे बॅनरवरून व इतर ठिकाणी वगळल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत या कार्यक्रमावर एक प्रकारचा बहिष्कार टाकल्याचे दिसून आले. त्यामुळे शिवसेनेच्या या अंतर्गत वादाला नव्याने तोंड फुटले आहे.
शिवसेनेचा कार्यक्रम असल्याने शिवसेनेचे परिवहन मंत्री तथा पालघरचे संपर्क मंत्री प्रताप सरनाईक कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र, ते व्यासपीठावर उपस्थित असताना बोईसर विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित नव्हते. त्यामुळे शिवसेनेची अंतर्गत वादावादी या कार्यक्रमात पुन्हा एकदा उफाळून आली आहे. या कार्यक्रमाला जिल्हा प्रमुख कुंदन संखे, आमदार राजेंद्र गावीत उपस्थित असताना या क्षेत्रातील जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण तसेच या भागातील प्रमुख पदाधिकारी प्रभाकर राऊळ, नीलम संखे, मुकेश पाटील, बोईसर शहर प्रमुख अतुल देसाई व इतर पदाधिकारी अशा प्रमुख पदाधिकाऱ्यांसह काही कार्यकर्त्यांनी गैरहजेरी लावली.
हा कार्यक्रम भव्य दिव्य झाला असला तरी शिवसेनेच्या अंतर्गत नाराजीमुळे शिवसेनेचे पदाधिकारी या कार्यक्रमाला हजर नसल्याने एक वेगळी चर्चा बोईसरमध्ये सुरू झाली आहे. आम्ही त्या ठिकाणी कसे जाणार ? असे एका प्रमुख पदाधिकाऱ्याने सांगितले. तर ज्यांना ज्यांना संपर्क साधला, असे सर्व आले व त्यांची नावे घातली. मात्र, ज्यांनी प्रतिसाद दिला नाही, अशांची नावे आम्ही टाकली नाहीत, असे शिवसेनेचे उपनेते व या कार्यक्रमाचे संयोजक जगदीश धोडी यांनी सांगितले. दरम्यान ठाकरे गटाकडून शिवसेनेकडे आलेले वैभव संखे यांच्याबद्दल पूर्वीपासून असलेली नाराजी या कार्यक्रमांच्या निमित्ताने पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याची चर्चा जोर धरत आहे.