पालघर शहर : ऐतिहासिक महत्व असलेल्या पालघरच्या शिरगाव किल्ला संवर्धनासाठी आणि ऐतिहासिक पर्यटनाला चालना मिळावी म्हणून राज्य सरकारने पावले उचलली आहेत. शिरगाव किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासनाच्या पुरातत्व विभागाकडून स्थळ व्यवस्थापन आराखडा तयार केला जाणार आहे. त्यासाठी संवर्धन तज्ज्ञ वास्तूशिकल्पकारांच्या नेमणुकीसाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. किल्ल्यातील भौतिक सुविधा आणि पर्यटकांना आवश्यक सर्व सुविधा उभारण्यात येणार असल्याने ऐतिहासिक पर्यटनाला महत्व येणार आहे.
१७३९ साली मराठ्यांनी हा किल्ला डहाणू, केळवे, तारापूर या किल्ल्यांसोबत जिंकला होता. त्याआधी या किल्ला पोर्तुगीजांकडे होता. १८१८ मध्ये इतर किल्ल्यांसोबत हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. १६ व्या शतकात पोर्तुगीजांनी बांधलेला हा किल्ला १७३७ ते १७३९ दरम्यान चिमाजी आप्पा यांनी मराठ्यांसाठी मिळवला होता. या अभेद्य किल्ल्याची पडझड झाल्यानंतर त्याच्या संवर्धनाची गरज अधोरेखित होत होती.
किल्ल्याच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने पुढाकार घेऊन किल्ल्याची दुरुस्ती व इतर कामांसाठी यापूर्वी जवळपास सव्वा सहा कोटीचा निधी खर्च केला होता. मात्र आता इतिहास पर्यटनाच्या दृष्टीने हा किल्ला आणि येथे भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी सर्व सुविधा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे इतिहास,गड किल्ले पर्यटनाला चालना मिळणार असून या माध्यमातून पर्यटकांना इतिहास समजून घेता येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या रत्नागिरी विभागाकडून स्थळ व्यवस्थापन आराखडा तयार करण्याची मान्यता मिळाली आहे.
किल्ल्याच्या दुरुस्तीसह संवर्धनाच्या आवश्यक बाबी,किल्ल्याच्या इतिहासाची माहिती देणारी विविध दालने,पर्यटकांसाठी विविध पायाभूत,मूलभूत अशा आवश्यक सुविधा,सुरक्षा व्यवस्था आणि इतर प्रकारच्या सर्व सुविधा उभारणीसाठी मार्गदर्शक नियमावलीच्या आधारे आराखडा तयार केला जाणार आहे.
सुबक बांधणीचा नमुना
शिरगावचा किल्ला साधारण २०० फूट लांब व १५० फूट रुंदीचा असून किल्ल्याची तटबंदी ३५ फूट उंच व १० फूट रुंद आहे. किल्ल्याला चार बुरूज असून प्रवेशद्वाराजवळ एक बुरूज आहे. प्रवेशद्वाराच्या वर एक अत्यंत सुबक बांधणीचा चबुतरा आहे. येथील तटबंदीवर, बुरुजांवर जाण्यासाठी किल्ल्याच्या आत असणाऱ्या तटबंदीच्या बाहेरून पायऱ्या असल्या तरी बुरुजांवर जायला तटबंदीच्या अंतर्भागातूनही पायऱ्या केलेल्या आहेत. किल्ल्याच्या पश्चिमेकडील तटबंदीत आणखी एक द्वार आहे.