खानिवडे: महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये दरवर्षी भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण होत असताना त्याचा सर्वाधिक फटका पशुपालकांना बसत आहे. माणसालाच पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल, तर पाळीव जनावरांचे काय, हा प्रश्न सतावणाऱ्या नगर जिल्ह्यातील शेळी , मेंढपाळ आणि गोपालकांनी आता चारा व पाण्याच्या शोधात थेट पालघर जिल्ह्याकडे धाव घेतली आहे.
नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी गावचे मारुती कोळपे हे आपल्या पत्नी व शेळ्या-मेंढ्यांच्या कळपासह पालघर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. उन्हाळ्याच्या कडक दिवसांतही पालघर जिल्ह्यात धरणांच्या कालव्यांमुळे काही भागात सिंचन सुरू असल्याने पडीक व अतिरिक्त जागांवर चांगले गवत उगवते. हाच चारा शेळ्या-मेंढ्यांसाठी जीवनदायी ठरत आहे.
नगरहून कळपासह पायी प्रवास करत आलेले हे मेंढपाळ मे महिन्यापर्यंत पालघरमध्ये वास्तव्यास असतात. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात किंवा पडीक जमिनीत चारा उपलब्ध असतो, त्या ठिकाणी तात्पुरती वस्ती करून जनावरे चारली जातात. चारा संपल्यानंतर पुढील शेतकऱ्याकडे मुक्काम हलवला जातो.
या स्थलांतरामुळे शेतकऱ्यांनाही फायदा होत असून जनावरांच्या विष्ठेमुळे जमिनीला नैसर्गिक सेंद्रिय खत मिळते. त्यामुळे शेतीची सुपीकता वाढण्यास मदत होत असल्याचे शेतकरी सांगतात. ही प्रक्रिया साधारण मे महिन्याच्या मध्यापर्यंत सुरू राहते. त्यानंतर पावसाळ्याची चाहूल लागताच हे मेंढपाळ पुन्हा आपल्या गावाकडे परतीचा प्रवास सुरू करतात.
मराठवाडा व नगर परिसरातील अनेक कुटुंबांचा शेळ्या-मेंढ्या पालन हा पारंपरिक व्यवसाय असून बदलते हवामान, घटते पर्जन्यमान आणि कमी होत चाललेली चराऊ जमीन यामुळे हा व्यवसाय संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत पालघर जिल्हा या भटक्या पशुपालकांसाठी उन्हाळ्यातील आश्रयस्थान ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दुष्काळी भागातून अनेक मेंढपाळ हे याभागात चाऱ्यासाठी येत असतात.त्यातीलच हे मेंढपाळ आहे
पाऊस कमी असल्याने चाऱ्यासाठी भटकंती
“दरसाल आम्ही या भागात येतो. आमच्या भागात पाऊस कमी असल्याने चारा-पाण्याची मोठी समस्या भेडसावते. माळरानेही कमी होत आहेत. त्यामुळे पारंपरिक शेळ्या-मेंढ्या पालन व्यवसाय टिकवणे कठीण झाले आहे. मात्र पालघर जिल्ह्यात चारा, पाणी आणि जनावरांना चांगला भाव मिळत असल्याने आम्हाला येथे आधार मिळतो,” असे वसई तालुक्यातील नवसई जांभुलपाडा भागातील शेतात मेंढ्या चारणारे मारुती कोळपे यांनी सांगितले.