वसईच्या पूर्व भागात तीव्र पाणीटंचाई; पहाटेपासून पाण्यासाठी रांगा  pudhari photo
पालघर

Water Shortage Vasai : वसईच्या पूर्व भागात तीव्र पाणीटंचाई; पहाटेपासून पाण्यासाठी रांगा

उन्हाळ्याची चाहूल लागताच नागरिक त्रस्त; ग्रामीण भाग टँकरवर अवलंबून

पुढारी वृत्तसेवा

मनवेल पाडा : उन्हाळ्याची सुरुवात होताच वसईच्या पूर्व भागात पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. काही ठिकाणी पाणीपुरवठा अनियमित झाला असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. महानगरपालिका क्षेत्रातील शहरी भागात पाणीटंचाई आटोक्यात असली तरी ग्रामीण व उपनगरी भागात स्थिती गंभीर होत चालली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही वसई पूर्वेतील गावांमध्ये आणि वाड्यांमध्ये नळ कोरडे पडले आहेत. नागरिकांना पहाटेपासून पाणी मिळवण्यासाठी रांगा लावाव्या लागतात. काही भागात आठवड्यातून फक्त दोन वेळा पाणीपुरवठा होत असल्याने लोकांना पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी आणि दैनंदिन वापरासाठी पाणी साठवणे अवघड झाले आहे.

नगरपालिकेच्या वतीने काही भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो; परंतु टँकर उशिरा पोहोचणे, पुरेसे पाणी न मिळणे आणि वितरणात गोंधळ यामुळे रहिवाशांचा संताप वाढला आहे. ‌‘आम्ही दररोज पाण्यासाठी धावपळ करतो. पाण्याशिवाय दैनंदिन आयुष्य ठप्प झाले आहे,‌’ असे स्थानिक गृहिणीनि सांगितले.

महानगरपालिकेचे अधिकारी मात्र पाणीपुरवठा सुरळीत असल्याचा दावा करतात. ‌‘टँकरद्वारे गरजू भागांना नियमित पाणी पुरवठा केला जात आहे,‌’ असे त्यांनी म्हटले आहे. मात्र नागरिकांचे म्हणणे वेगळे आहे. वास्तवात अनेक वस्त्यांमध्ये टँकर दिवसेंदिवस कमी प्रमाणात येत आहेत, आणि पाण्याचे प्रमाण पुरेसे नसते. सध्या फेब्रुवारी महिन्यातच टंचाईची झळ बसू लागली असल्याने मार्च आणि एप्रिलमध्ये परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ग्रामीण भागात साठवण टाक्यांची कमतरता आणि जुनी पाइपलाइन व्यवस्था यामुळे पाणीपुरवठा अनियमित होत आहे. स्थानिकांनी प्रशासनाला पत्रव्यवहार करून लवकर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. ‌‘प्रत्येक वर्षी हेच चित्र दिसते. पाणीटंचाईसाठी कायम उपाययोजना का केल्या जात नाहीत?‌’ असा सवाल स्थानिक रहिवाशांनी उपस्थित केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT