Wada Water Crisis Pudhari
पालघर

Wada Water Crisis: उज्जैनी ग्रामपंचायत हद्दीत भीषण टंचाई; साखरशेत, आंबेवाडी व घायपातपाड्यात विहिरी आटल्या

टँकरची मागणी करूनही प्रशासनाला ही समस्या गंभीर वाटत नसल्याने लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

वाडा: जून महिना संपत आला मात्र अजूनही पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी आधीच चिंतेत आहेत. वाड्यातील ग्रामीण भागात मात्र जनता पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करीत असून पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा आता सर्वांना बेजार करीत आहे.

उज्जैनी ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या अनेक पाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई उग्र रूप धारण करीत असून सर्व विहिरी कोरड्या पडल्या आहेत. टँकरची मागणी करूनही प्रशासनाला ही समस्या गंभीर वाटत नसल्याने लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

वाड्यातील ग्रामीण भागात आधीच भीषण टंचाईचा सामना जनतेला करावा लागत असून मान्सून लांबल्याने चिंतेत भर पडली आहे. पाण्याचे बहुतांश स्रोत आटू लागले असून नद्या कोरड्या पडल्या आहेत. उज्जैनी ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या साखरशेत, आंबेवाडी व घायपातपाडा या गावांमध्ये विहिरी पूर्णपणे आटल्या आहेत.

साखरशेत व आंबेवाडीत ३५० लोकसंख्या तर घायपातपाड्यात ५७८ लोकसंख्या आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे आगमन झाले की पाण्याची टंचाई आपोआप दूर होते मात्र यावर्षी जून महिना संपत आला मात्र पावसाचा थांगपत्ता नसल्याने चिंता अजून वाढली आहे.

साखरशेत मध्ये तर जीव धोक्यात घालून हंडाभर पाण्यासाठी विहिरीत उतरण्याची वेळ लोकांवर येत असून अन्य पाड्यात पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. पाणी पुरवठा विभागाकडे टँकर सुरू करण्यासाठी मागणी करण्यात आली आहे मात्र कुणाचा जीव गेल्यावर पाणी मिळेल का असा सवाल विचारला जात आहे.

साखरशेत पासून मैलाच्या अंतरावर असणाऱ्या विहिरीकडे सर्वांना धाव घ्यावी लागत असून आंबेवाडी येथील विहिरी पूर्णपणे कोरडी पडल्याने त्यांनाही याच विहिरीचा आधार आहे. घायपातपाडा गावात मोठी लोकसंख्या असून विहिरीत पाणी नसल्याने लोकांना कसरत करावी लागते.

प्रशासनाला तर गांभीर्य वाटत नाही किमान मेघराजाला तरी दया यावी अशी विनवणी केली आहे. सरपंच कृष्णा रोज यांना विचारणा केली असता टँकरसाठी प्रस्ताव पाठविला असून पाणीपुरवठा विभागाला जाग येत नाही हे दुर्दैवी आहे असे त्यांनी सांगितले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT