kurlai devi saphale  Pudhari photo
पालघर

kurlai devi saphale Navratri|सफाळ्यातील नवसाला पावणारी कुर्लाई देवी

नवरात्रौत्सवात पालघर, मुंबई, ठाण्यातून भाविकांची मांदियाळी

पुढारी वृत्तसेवा

सफाळे : सफाळे येथील नवसाला पावणारी कुर्लाई देवी पंचक्रोशीत प्रसिद्ध असून, नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी होत आहे. मुंबई, ठाणे, वसई, विरार, बोईसर, पालघर आणि बदलापूर परिसरातून महिला व भाविक मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी येत आहेत. भक्तिमय वातावरण, गरबा नृत्य आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे मंदिर परिसराला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले आहे.

श्री ग्रामदेवी कुलाई विश्वस्त मंडळ, सफाळे यांच्या वतीने दरवर्षी नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जातो. मंदिरात दुगदिवीची चांदीची मूर्ती विराजमान करून घटस्थापना केली जाते. गावातील तसेच पंचक्रोशीतील भाविक दुर्गामाता आणि कुलाई मातेची मनोभावे पूजा-अर्चा करतात. रात्री गरबा नृत्याचे आयोजन करण्यात येते. याशिवाय आरती, भजन-कीर्तन, फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि हळदी-कुंकू यांसारखे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जातात.

ग्रामस्थांच्या माहितीनुसार, १९५० पूर्वी कुर्लाई देवीचे स्थान सफाळे परिसरातील सरतोडी येथे होते. कालांतराने सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून देवीची सफाळे येथे स्थापना करण्यात आली. तेव्हापासून देवीच्या दर्शनासाठी आणि नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. नोकरी-व्यवसायानिमित्त गावाबाहेर राहणारे ग्रामस्थही यात्रेच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित राहतात. कुर्लाई देवीविषयी अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. सफाळे येथील कुर्लाई देवी, जस्थानातील किरवली देवी, रामेश्वरातील कन्याकुमारी आणि हिमालयातील सुवर्ण लंकेश्वरी देवी अशी देवीची चार नावे सांगितली जातात.

सुमारे शंभर वर्षांपूर्वी सरतोडी येथील सामंत-बाबार्डेकर घराण्यातील एका भक्ताला देवीने दृष्टांत दिल्याची आख्यायिका सांगितली जाते. रतोडीपासून तीन ते चार मैल अंतरावर एका वृक्षाजवळ आपण वास्तव्यास असल्याचे देवीने दृष्टांतात सांगितले. सामंत आणि पाटील कुटुंबीयांना झालेल्या या दृष्टांतानंतर देवीला एका विवरातून बाहेर काढून चैत्र वद्य पंचमीला सरतोडी येथे तिची स्थापना करण्यात आली, असे सांगितले जाते.

धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

कुर्लाई देवीचे मंदिर प्रशस्त जागेत असून, मंदिर परिसरात गरबा नृत्यासाठीही पुरेशी जागा आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात दररोज भाविक दर्शनासाठी येत असून, अनेक महिला देवीची ओटी भरून मनोकामना व्यक्त करतात. उत्सवाचे नियोजन सुरळीतपणे पार पाडण्यासाठी विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT