Sand smuggling in Parli Wildlife Forest Area
वाडा : पुढारी वृत्तसेवा
परळी वन्यजीव परिक्षेत्रातील ओगदा वन परिमंडळ क्षेत्रात शेकडो ब्रास वाळूची तस्करी करण्यात आली असून वनविभागाच्या डोळ्यासमोर हा प्रकार सुरू असताना डोळेझाक का करण्यात आली असा सवाल विचारला जात आहे. आश्चर्य म्हणजे या भागात जाण्यासाठी मशीनच्या साह्याने रस्ता बनविण्यात आला मात्र तरीही वनविभागाचे डोळ्यांवर हात आहेत. या प्रकरणी तात्काळ चौकशी करून गुन्हा दाखल करावा व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
वनविभागाच्या हद्दीतून असे म्हणतात की, आपण साधा दगडही उचलून घरी नेऊ शकत नाही. मात्र इतका कडक कायदा असतानाही परळी वन्यजीव विभागात अनागोंदी कारभार सुरू असल्याचा लोकांचा आरोप आहे. परळी परिक्षेत्रातील ओगदा परिमंडळ क्षेत्रात कंपार्टमेंट नंबर 534 येथे राखीव वनात मोठा सिमेंट बंधारा आहे.
बंधार्यात वर्षांनुवर्षे संवर्धन केलेली वाळू असून मुबलक प्रमाणावर पाणी देखील आहे. याच वाळूवर मागील काही महिन्यांपासून तस्करांनी डल्ला मारला असून शेकडो ब्रास वाळूचे उत्खनन करण्यात आले आहे. जेसीबी मशीनच्या साह्याने तर कधी मजूर लावून वाळूचे उत्खनन करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
वन विभागाच्या हद्दीत खरेतर बाहेरील वाहनांना शिरकाव करण्यास मज्जाव केला जातो. मात्र ओगदा परिमंडळ क्षेत्रात मशीनच्या साह्याने रस्ता तयार करून ट्रक व ट्रॅक्टर अशा वाहनाची सतत रेलचेल असून वाळूची वाहतूक करण्यात आली आहे. कित्येक महिने सुरू असलेला हा प्रकार वनविभागाला दिसला नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात असून वन विभागाने कुणावरही गुन्हा दाखल केलेला नाही.
यासंदर्भात विचारणा केली असता माहिती घेऊन संबधीतांवर कारवाई केली जाईल असे परळी परिक्षेत्र अधिकारी पवार यांनी सांगितले.