RTE Admission Pudhari
पालघर

RTE Admisson: आरटीईअंतर्गत पालघर जिल्ह्यात 66 टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण

उर्वरित विद्यार्थ्यांच्या प्रवेशप्रक्रियेसाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

पुढारी वृत्तसेवा

पालघर शहर : शिक्षण हक्क (आरटीई) कायद्यांतर्गत आर्थिकदृष्ट्या मागास आणि वंचित घटकातील बालकांसाठी 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया जिल्ह्यात सुरू झाली आहे. पहिल्या निवड यादीतील 3183 विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत 2102 विद्यार्थ्यांनी (66.04 टक्के) आपला प्रवेश निश्चित केला आहे. दरम्यान, शासनाने या प्रक्रियेसाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली असून यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

पालघर जिल्ह्यातील 268 शाळांतील 5685 रिक्त जागांसाठी आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. पहिल्या लॉटरीमध्ये निवड झालेल्या 3183 विद्यार्थ्यांपैकी 2102 विद्यार्थ्यांनी 22 एप्रिल पर्यंत प्रवेश निश्चित केला आहे. तसेच पहिल्या यादीत नाव न आलेल्या 2206 विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी पुढील महिन्यात जारी करण्यात येणार आहे.

पालकांनी कागदपत्रांचे दोन संच तयार करून पडताळणी समितीकडून तपासून घ्यावेत आणि त्यानंतर संबंधित शाळेत जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा. 30 एप्रिलनंतर पहिल्या यादीतील प्रवेश बंद होऊन रिक्त जागांसाठी प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येईल.

ही प्रवेश प्रक्रिया 10 ते 20 एप्रिल या कालावधीत पूर्ण रणे अपेक्षित होते. मात्र, अनेक पालकांना कागदपत्रांची पूर्तता करण्यास वेळ लागत असल्याने आणि तांत्रिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता होती. ही बाब लक्षात घेऊन शासनाने आता 21 एप्रिल ते 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

प्रवेशासाठी अलॉटमेंट लेटर (प्रवेश निश्चिती प्रमाणपत्र), हमीपत्र, बालकाचा जन्माचा दाखला, आधार कार्ड, रहिवासी पुरावा (रेशन कार्ड/वीज बिल), जातीचा किंवा उत्पन्नाचा दाखला ही महत्त्वाची कागदपत्रे आहेत. ज्या पालकांच्या पाल्यांची निवड यादीत नाव आले आहे, त्यांनी त्वरित तालुकास्तरावरील पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची तपासणी करून घ्यावी. असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी केले आहे.

तालुकानिहाय दाखल अर्ज व प्रवेश घेतलेली विद्यार्थी संख्या

वसई : 2177 पैकी 1403 बालकांचे प्रवेश (सर्वाधिक).

पालघर : 617 पैकी 445 प्रवेश.

डहाणू : 174 पैकी 111 प्रवेश.

वाडा : 108 पैकी 62 प्रवेश.

तलासरी : 48 पैकी 32 प्रवेश.

जव्हार : 31 पैकी 28 प्रवेश.

विक्रमगड : 28 पैकी 21 प्रवेश.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT