Palghar News Pudhari
पालघर

Palghar News: जंगलातील ‌‘कारवी‌’ ठरतेय वनवासींचा आधार

शेतीपासून पारंपरिक घरांपर्यंत कारवीला वाढती मागणी

पुढारी वृत्तसेवा

विश्वनाथ एस. कुडू

खानिवडे: वसई परिसरातील जंगलांमध्ये नैसर्गिकरीत्या उगवणारी कारवी आजही ग्रामीण जीवनाचा महत्त्वाचा भाग ठरत असून शेती, झोपड्या, पारंपरिक कुडांची घरे तसेच वेलवर्गीय पिकांच्या आधारासाठी तिची मोठ्या प्रमाणात मागणी कायम आहे.

त्यामुळे वसई पूर्वेतील वनवासी बांधवांना काही दिवसांचा हंगामी रोजगार उपलब्ध होत आहे. सध्या कारवीने भरलेल्या बैलगाड्या मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून वसईच्या आगर भागाकडे जाताना पाहायला मिळत आहेत.

वसईची प्रसिद्ध नागवेल पान शेती, कारले, तोंडली, पडवळ, चवळी यांसारख्या वेलवर्गीय भाज्यांच्या लागवडीसाठी कारवीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. तसेच सुकेळी सुकवण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या साट्यांमध्येही कारवी महत्त्वाची भूमिका बजावते. पर्यावरणपूरक आणि हवेशीर घरांच्या बांधकामातही कारवीचे विशेष स्थान असून उन्हाळ्यात थंडावा व हिवाळ्यात उबदारपणा टिकवून ठेवण्याची नैसर्गिक क्षमता या कुडांच्या भिंतींमध्ये आढळते.

10 ते 12 फूट उंच वाढणारी, वजनाने हलकी पण अत्यंत टणक अशी कारवी ही नैसर्गिक वासा मानली जाते. तिच्या आतील भागात थर्माकोलसदृश नैसर्गिक पदार्थ असल्याने उष्णतेचा अडथळा निर्माण होतो आणि घरातील तापमान संतुलित राहण्यास मदत मिळते. त्यामुळे पूर्वी ग्रामीण भागातील ‌‘मराडी‌’ घरांच्या बांधकामात कारवीला मोठे महत्त्व होते.

सुमारे 25 ते 30 वर्षांपूर्वी वसईच्या ग्रामीण भागातील बहुतांश घरे लाकडी सांगाड्यावर आधारित असत. या घरांच्या भिंती कारवी व बांबूपासून विणलेल्या कुडांच्या असत आणि त्यावर माती व शेणाचे सारवण केले जाई. अशा घरांमध्ये कोणत्याही ऋतूत आतील तापमान समसमान राहत असे.

लग्नसमारंभातील मंडप उभारणीसाठीही कारवीचा वापर होत असे. मात्र आता काँक्रीटच्या वाढत्या जंगलामुळे ही पारंपरिक संस्कृती मागे पडत चालली असली तरी दुर्गम वनवासी भागांत आजही अशी घरे पाहायला मिळतात.

वनवासींसाठी रोजगाराचा आधार

टकमक व तुंगार परिसरातील डोंगररांगांमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवीची नैसर्गिक वने आहेत. वनवासी बांधव जंगलातून कारवी गोळा करून भारे बांधतात आणि ते गाडीवानांना विकतात. त्यानंतर बैलगाड्यांद्वारे ही कारवी वसईच्या आगर भागात विक्रीसाठी नेली जाते.

सध्या एका भाऱ्याला 250 ते 350 रुपये भाव मिळत असून दिवसाला दोन फेऱ्या झाल्यास 600 ते 700 रुपयांपर्यंत रोजगार मिळत असल्याचे कारवी गोळा करणाऱ्यांनी सांगितले. तर गाडीवानांनाही एका फेरीत दोन ते तीन हजार रुपयांपर्यंत फायदा होत असल्याचे समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT