चेतन इंगळे
विरार- मुंबईसह वसई-विरार परिसरातील लाखो नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार आजही सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करून हॉटेल्स, उपाहारगृहे, फास्ट फूड केंद्रे, फरसाण उत्पादक आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून वापरून झालेले खाद्यतेल पुन्हा बाजारात विकले जात असल्याची बाब समोर आली आहे.
शासनाने वारंवार सूचना देऊनही आणि अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाया होत असतानाही या प्रकारावर पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही. परिणामी नागरिकांच्या ताटात पुन्हा पुन्हा तेच घातक तेल पोहोचत असल्याची भीती व्यक्त होत आहे.
विशेषतः वसई, विरार, नालासोपारा, नायगाव, अर्नाळा आणि परिसरात गेल्या काही वर्षांत हॉटेल्स, फास्ट फूड केंद्रे आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या व्यवसायात मोठी वाढ झाली आहे. वाढत्या मागणीमुळे खाद्यतेलाचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
मात्र त्याचबरोबर वापरलेल्या तेलाच्या विल्हेवाटीबाबतचे नियम पाळले जात आहेत का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक पातळीवर वापरलेले तेल खासगी वितरकांकडे विकले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत.
नियमांनुसार खाद्यतेलाचा मर्यादित वापर झाल्यानंतर ते जैवइंधन निर्मितीसाठी शासनमान्य संस्थांकडे सुपूर्द करणे आवश्यक आहे. तसेच वापरलेल्या तेलाची नोंद ठेवणेही बंधनकारक आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी एकाच तेलाचा सहा, सात किंवा आठ वेळा वापर केल्याचे आरोप आहेत. त्यानंतर हे तेल अधिकृत प्रक्रियेकडे न पाठवता दलाल आणि वितरकांच्या माध्यमातून पुन्हा बाजारात विकले जात असल्याचे सांगितले जाते.
माहितीनुसार, मुंबई आणि वसई-विरार परिसरातील हजारो हॉटेल्स, उपाहारगृहे आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून दररोज मोठ्या प्रमाणावर वापरलेले तेल बाहेर पडते. शासनमान्य कंपन्या हे तेल जैवइंधनासाठी खरेदी करत असल्या तरी खासगी बाजारात अधिक पैसे मिळत असल्याने काही व्यावसायिक हे तेल तेलमाफियांना विकतात. त्यानंतर या तेलाची साठवणूक करून विविध मार्गांनी त्याचा पुनर्वापर केला जातो. या संपूर्ण साखळीमधून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे बोलले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, वापरलेल्या तेलाचा काळसर रंग आणि वास कमी करण्यासाठी काही ठिकाणी त्यावर विविध प्रक्रिया केल्या जातात. तेल गाळून त्यात इतर पदार्थ मिसळले जातात. त्यामुळे ते तेल नवीन असल्याचा भास निर्माण होतो. मात्र तज्ज्ञांच्या मते, अशा प्रक्रियेमुळे तेलातील घातक रासायनिक घटक नष्ट होत नाहीत. उलट अशा तेलाचा पुनर्वापर नागरिकांच्या आरोग्यासाठी अधिक धोकादायक ठरू शकतो.
विशेष म्हणजे वसई-विरार परिसरात मोठ्या प्रमाणावर चायनीज स्टॉल, वडा-पाव केंद्रे, भजी-समोसा विक्रेते, फरसाण उत्पादक आणि लहान-मोठी हॉटेल्स कार्यरत आहेत. दररोज हजारो विद्यार्थी, नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी खाद्यपदार्थांचे सेवन करतात. त्यामुळे वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर होत असल्यास त्याचा थेट परिणाम स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीमुळे या अवैध व्यवसायाला आणखी चालना मिळाल्याचे बोलले जाते. कमी खर्चात जास्त नफा मिळविण्याच्या उद्देशाने काही व्यावसायिक वापरलेल्या तेलाचा वापर करत असल्याचा आरोप आहे. यामुळे अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन होत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न दुय्यम ठरत असल्याची टीका होत आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, खाद्यतेल वारंवार तापविल्याने त्यामध्ये ट्रान्स फॅट्स, ऑक्सिडाईज्ड घटक आणि विविध विषारी रसायने तयार होतात. अशा तेलात तयार झालेले पदार्थ नियमितपणे सेवन केल्यास हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेहाशी संबंधित गुंतागुंत, पचनसंस्थेचे विकार, यकृताचे आजार आणि कर्करोगाचा धोका वाढू शकतो. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेरील खाद्यपदार्थांचे नियमित सेवन करणाऱ्या व्यक्तींना याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासन, वसई-विरार महापालिका आणि संबंधित यंत्रणांनी संयुक्त मोहीम राबवून वापरलेल्या तेलाच्या खरेदी-विक्रीची सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या तेल वापराच्या नोंदी तपासणे, अचानक धाडी टाकणे, तेलाचे नमुने तपासणीसाठी पाठविणे आणि दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
गेल्या काही वर्षांत या विषयावर अनेकदा चर्चा झाली, काही कारवायाही झाल्या; मात्र परिस्थितीत फारसा बदल झालेला दिसून येत नाही. त्यामुळे "पुन्हा ताटात तेच तेल" हा केवळ मथळा न राहता नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर वास्तव बनत चालल्याची खंत व्यक्त होत आहे. प्रशासनाने वेळीच कठोर पावले उचलली नाहीत तर भविष्यात सार्वजनिक आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
"वारंवार वापरलेल्या तेलामध्ये ट्रान्स फॅट्स आणि कर्करोगास कारणीभूत ठरणारे घटक तयार होतात. अशा तेलात बनविलेले पदार्थ सातत्याने खाल्ल्यास हृदयविकार, पचनसंस्थेचे आजार आणि कर्करोगाचा धोका वाढतो. नागरिकांनी बाहेरील तळलेले पदार्थ खाताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे."— डॉ. ज्ञानेश्वर तिपे, आरोग्य तज्ज्
"नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर केवळ दंड नव्हे तर कठोर फौजदारी कारवाई झाली पाहिजे. वापरलेल्या तेलाचा काळाबाजार पूर्णपणे मोडून काढण्याची गरज आहे."— राजेश गुरखे, विरार
"आपण पैसे देऊन अन्न खातो, पण ते कोणत्या तेलात बनविले आहे याची कोणतीही खात्री नसते. प्रशासनाने नियमित तपासण्या करून दोषींना धडा शिकवावा."— स्वाती शहा, नालासोपारा