विक्रमगड ः सध्या निसर्गात दुर्मिळ होत चाललेल्या पशु-पक्षी व सापांचे ग्रामीण भागात दर्शन होत आहे. पाली येथील नकुल पाटकर यांच्या दुकानात नागरी वस्तीमध्ये दुर्मिळ कुकरी सर्प आढळून आला. ही माहिती मिळताच सर्पमित्र पप्पु दिघे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन अत्यंत शिताफिने या सापाला बरणीत बंद केले व त्याला सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
यावेळी सर्पमित्र पप्पु दिघे यांनी कुकरी सर्पाबाबत माहिती देताना सांगितले की, हा सर्प बिनविषारी असून त्याची लांबी साधारणतः 30 ते 60 सेंटीमीटर इतकी असते. इतर सापांच्या तुलनेत याचे दात कमी असतात. वरच्या जबड्यातील मागील दात गुरख्यांच्या कुकरीसारखे वळणदार असल्याने या सापाला ‘कुकरी साप’ असे नाव देण्यात आले आहे.
हा साप स्वभावाने चपळ, मात्र भित्रा व लाजाळू असतो. सरडे, पाली व त्यांची अंडी हे त्याचे प्रमुख खाद्य आहे. त्याचे शरीर तपकिरी रंगाचे असून त्यावर 20 ते 60 काळे आडवे पट्टे आढळतात. धोका जाणवल्यास हा साप आपले शरीर फुगवतो. गवतावरील किडे, आळ्या, नाकतोडे व छोटे बेडूकही त्याच्या आहारात समाविष्ट असतात.
मात्र ग्रामीण भागात कुकरी सर्प विषारी असल्याचा गैरसमज असल्याने अनेक वेळा या निरुपद्रवी सापाची हत्या केली जाते. या चुकीच्या समजुतीमुळे आकर्षक अशा दिसणाऱ्या कुकरी सर्पाची संख्या ग्रामीण भागातून दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत असल्याची खंत सर्पमित्र पप्पु दिघे यांनी व्यक्त केली आहे.