वाडा : महामार्ग व सुंदर रस्त्यांमुळे खरेतर लोकांचे जीवनमान सुकर होते मात्र मनोर-वाडा-भिवंडी या महामार्गावर झालेल्या असंख्य अपघातांमुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागले आहेत. अजूनही ही परंपरा कायम असून खूपरी गावाजवळ घडलेल्या भीषण अपघातात पीक गावातील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. वाडा-भिवंडी हा महामार्ग आहे की मृत्यूचा सापळा असा सवाल विचारला जात असून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
पीक गावातील स्मित (गणू) हेमंत पाटील, १९ हा तरुण बिलोशी गावातील ब्लू स्टार कंपनीत तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत होता. बुधवारी दुचाकीने कामावर जात असताना सकाळी ७ च्या सुमारास खूपरी गावाजवळ मुरलीमनोहर हॉटेल परिसरात त्याला भीषण अपघात झाला.
प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार खड्ड्यातून दुचाकीला वाट काढताना स्मित याचा तोल गेला व तो थेट लोखंड भरलेल्या ट्रेलरच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाला. वाडा पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.
महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम एका कंपनीला देण्यात आले असून जागोजागी खोदकाम करून या कंपनीने अक्षरशः उच्छाद मांडल्याचे लोकांचे म्हणणे आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत असून चांगल्या रस्त्यासाठी आणखी किती बळी द्यावे लागणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
स्मित हा अत्यंत शांत स्वभावाचा घरातील एकुलता एक मुलगा होता. स्मित याच्या पश्चात दोन बहिणी, आईवडील असा परिवार असून तरुण वयात झालेल्या अकस्मात मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.