वाडा (पालघर) : अवकाळी पावसाने एकीकडे थैमान घातले असताना शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहायला सरकार आहे कुठे असा सवाल उपस्थित केला जात आहे. पावसाची संततधार मात्र अजूनही सुरूच असल्याने आता भातशेती करणारा शेतकरी पूर्णपणे संपुष्टात आला आहे. शिलोत्तर गावातील एका शेतकऱ्याला प्रधानमंत्री फसल विमा योजनेमार्फत चक्क २ रुपये ३० पैसे नुकसान भरपाई आली असून शेतकऱ्यांची सुरू असणारी ही थट्टा बघून आता हसायचे की रडायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
शिलोत्तर गावातील मधुकर बाबुराव पाटील या शेतकऱ्याने पीक विमा काढला असून त्याच्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे देखील करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाकडून त्याला १ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली असून पिकांचे नुकसान मात्र त्याहून अधिक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. प्रधानमंत्री फसल योजनेमार्फत तर भरपाईच्या नावाने थट्टा केल्याचे त्यांचे म्हणणे असून चक्क २ रुपये ३० रुपयांची भरपाई त्यांच्या नावे कुडूस येथील एका बँकेत जमा झाली आहे. नुकसान भरपाईचा हा प्रकार कुणाच्या चुकीमुळे झाला आहे की खरंच सरकारच्या दप्तरात शेतकऱ्यांची किंमत इतकीच शिल्लक आहे असा सवाल करीत मधुकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पावसाने हाहाकार माजवला असून शेतीवर अवलंबून असणारे आमच्यासारखे शेतकरी आज मेटाकुटीला आले आहेत. सरकारकडून मदतीची अपेक्षा होती मात्र २ रुपये भरपाई ही कुचेष्टा असून शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे.मधुकर पाटील, पीडित शेतकरी, शिलोत्तर.
मे महिन्यापासूनच पावसाची संततधार सुरू असून मान्सून वेळेत आल्याने शेतकरी आनंदात होता. शेतकऱ्याचा आनंद बहुधा निसर्गालाही बघवत नसून मान्सूनने झोडपून काढल्याने लागवड केलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. पंचनामे झाले मात्र नुकसान भरपाईच्या नावाने हजार पाचशे रुपये ते काहीना बाराशे पंधराशे रुपये मिळाल्याने शेतकरी संतप्त आहे. पिकं कधीतरी उभी राहन कापणीला आली तोच पुन्हा पावसाने कहर माजविल्याने शेतकरी संकटात सापडला. सध्या तालुक्यातील सर्व भातशेती संपुष्टात आली असून खायला अवघड होणार आहे.