पालघर : नविद शेख
उच्च न्यायालयाच्या निकाला नुसार पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात कार्यरत ४०४ शिक्षकांना आंतर जिल्हा बदली अंतर्गत कार्यमुक्त करण्यात आल्याने जिल्ह्यातील अनेक शाळा एक शिक्षकी किंवा शून्य शिक्षकी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सहा हजार ४९७पदे मंजूर आहेत. ४०४ शिक्षकांना कार्यमुक्त केल्यानंतर मानधन आणि कंत्राटी तत्वावरील एक हजार ६७शिक्षकांना समाविष्ट करूनही शिक्षकांची एक हजार १६३ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांची टक्केवारी १७.९० टक्के होत असल्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सुमारे साडे सात लाख विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होणार आहे.
दरम्यान शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदल्यांमुळे एक शिक्षकी तसेच शून्य शिक्षकी होणाऱ्या शाळांची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून कडून गोळा करण्याचे काम सुरु आहे. शाळांना सुरु असलेल्या गणेशोत्सवाच्या सुट्या संपल्यानंतर शिक्षकांचे नियोजन केले जाणार असल्याचे समजते. रिक्त पदांची माहिती शासनाला कळवण्यात आल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
मुंबई उच्च न्यायालयाने १५ जुलै २०२५ रोजी दिलेल्या निकालानुसार २०१७ ते २०२२ पर्यंतच्या कालावधीमध्ये आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र ठरलेल्या ४०४ प्राथमिक शिक्षकांना जिल्हा परिषदेकडून २५ जुलै २०२५ रोजी कार्यमुक्त करण्यात आले आहे. संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने आंतरजिल्हा बदलीसाठी केलेल्या विनंती नुसार शासन स्तरावरून पालघर जिल्ह्यातील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या करण्यात आल्या आहेत. शिक्षण विभागात शिक्षकांची संख्या कमी असल्यामुळे नवीन शिक्षक भरती झाल्याशिवाय आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यास जिल्हा परिषदेच्या तात्कालीन पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. होता. मोठ्या संख्येने शिक्षकांच्या बदल्या झाल्याने अनेक शाळा एक शिक्षकी किंवा शुन्य शिक्षकी होऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचा धोका वर्तवण्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात मराठी माध्यमातील शिक्षकांची सहा हजार ३२६ पदे मंजूर असताना सर्वाधिक एक हजार १११ पदे रिक्त आहेत. उर्दू माध्यमातील रिक्त पदांची टक्केवारी ३१.५३ टक्के आहे. गुजराती माध्यमातील शिक्षकांच्या मंजूर ४२ पदांपैकी १४ पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागा अंतर्गत मराठी, उर्दू, हिंदी माध्यमाच्या मंजूर सहा हजार ४९७ पदांपैकी एक हजार १६३ पदे रिक्त आहेत.