Palghar Avantika Express Woman Passenger Case
पालघर : मुंबईकडून इंदूरकडे जाणाऱ्या अवंतिका एक्स्प्रेसमध्ये जनरल कोचमध्ये महिला प्रवाशाला मारहाण करण्यात आली. हातावर रुद्राक्षाची माळ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव यावरुन वाद झाला. यातून अल्पसंख्याक समुदायातील महिला व तिच्या नातेवाईकाने मारहाण केल्याचा आरोप महिलेने केला असून या प्रकरणी पालघर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ठाण्यात वकील असलेल्या ॲड. शितल भोसले या मुलीला भेटण्यासाठी निघाल्या होत्या. शनिवारी रात्री अवंतिका एक्स्प्रेसच्या जनरल कोचमधून त्या प्रवास करत होता. जनरल डब्यात अल्पसंख्याक समाजाचे प्रवासी जास्त होते, असे तक्रारदार महिलेचे म्हणणे आहे.
महिलेच्या हातामध्ये रुद्राक्षाची माळ होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कोरले होते. प्रवासादरम्यान एका मुस्लिम महिलेने शितल भोसलेंना हटकले आणि त्यांच्याशी हुज्जत घालायला सुरूवात केली.
‘ये सब बकवास है’
“आप ये रुद्राक्ष पेहेनते हो क्या बकवास हैं,” असे त्या महिलेने भोसलेंना सांगितले. यावर भोसलेंनी “तुझ्या बुरख्याचा मला त्रास होतो असं मी म्हटलं का?,मग तुला माझ्या माळांचा त्रास का होतो?” असं प्रत्युत्तर दिले. यावरून वाद चिघळला आणि प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचले.
पालघर रेल्वे स्टेशन ओलांडत असताना ट्रेनमधील जमावाने ॲड. शितल भोसले यांच्यावर धारदार वस्तूने सरळ वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात अल्पसंख्यांक महिलेला मानेवर वार करायचा होता, पण मी तो वार चुकवला. मात्र माझ्या हाताला गंभीर दुखापत झाली, असे भोसलेंचे म्हणणे आहे.
वापी स्थानकात होमगार्ड कडून मदत नाही
बोरीवलीनंतर अवंतिका एक्स्प्रेस थेट वापी स्थानकावर थांबते. एक्स्प्रेस स्थानकात थांबल्यावर महिलेले होमगार्ड व स्थानिक पोलीस यांच्याकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना मदत मिळू शकली नाही.
पुढे रेल्वे हेल्पलाईनवर तक्रार नोंदवल्याने वलसाड येथे रेल्वे पोलिसांनी हल्ला करणारी महिला व पुरुषाला ताब्यात घेण्यात आले. सदर घटना पालघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने गुजरात पोलिसांनी महिलेला प्राथमिक उपचार करून पालघर पोलीस यांच्याकडे सकाळी ९ वाजता घेऊन आले. दुपारीपर्यंत पोलीस ठाण्यात जाब जबाब नोंदवण्याचे काम सुरू होते.
पोलीस निरीक्षक सुट्टीवर
पोलीस निरीक्षक सचिन इंगवले यांची साप्ताहिक सुट्टी असल्याने त्यांच्याशी फोन वरून संपर्क केल्यावर त्यांनी फोन न उचलल्याने त्यांची अधिकृत भूमिका कळू शकली नाही. मात्र पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली.
महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न?
महिलेला केवळ मारहाण करण्यापर्यंत ती अल्पसंख्यांक महिला थांबली नाही तर धारदार वस्तूने वार करताना तो हुकला व हातावर गेला. इथेच ती थांबली नाही तर विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला गेला, असे पीडित महिलेने पालघरयेथील नागरिकांशी बोलताना सांगितले. मला घेराव घालण्यात आला होता आणि कोणीही व्हिडिओ काढू नये, याचीही जमावाने खबरदारी घेतली होती, असा दावाही महिलेने केला आहे.
महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
धावत्या रेल्वेमध्ये रेल्वे सुरक्षा बलाचे म्हणजेत आरपीएफचे कर्मचारी गस्तीवर असून सुद्धा अशा घटना कशा घडतात, असा प्रश्न उपस्थित होतोय. पश्चिम रेल्वे जनसंपर्क अधिकारी यांच्याकडे ‘पुढारी’च्या प्रतिनिधीने सदर घटनेची चौकशी केली असता त्यांना याबाबत माहिती नव्हती. माहिती घेऊन कळवतो असे सांगून त्यांनी पुन्हा फोन उचलले नाहीत.
पालघर रेल्वेस्थानकात जेव्हा हिंदुत्ववादी संघटनांना ही गोष्ट समजल्यावर स्थानकात गर्दी झाल्याने स्थानिक शहर पोलिसांच्या मदतीने बंदोबस्त वाढवण्यात आला.