खानिवडे: बदलत्या वातावरणचा यंदा अनेक पिकांना फटका बसला असून पांढरा कांद्यावरही याचा परिणाम झाल्याचे पहायला मिळत आहे. लांबलेल्या पावसामुळे पालघर जिल्ह्याच्या भौगोलिक वातावरणात चांगले उत्पन्न देणारा सफेद कांदा यंदा उशिरा बाजारात दाखल झाला असून वसई तालुक्यातील आठवडे बाजारात स्वतः शेतकरी आणून विकत आहेत.
शेतात पांढरा कांदा तयार झाल्यानंतर त्याची काढणी करून स्वच्छ धुवून काढतात . व नंतर काही दिवस सावलीत सुकवतात . त्यानंतर या कांद्याच्या सुकलेल्या पातीच्या आधारे त्याच्या माळा बनवतात व बाजारात विकतात.
पालघर जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी जेमतेम उत्पादित होत होते.मात्र उत्पन्नाची खात्री आणि नकदी पीक असल्याने आता जिल्ह्यात सर्वदूर पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते. आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपला पावित्रा बदलून जादा मागणीनुसार पीक काढायला सुरवात केली असून त्याचा फायदा देखील त्यांना होत आहे .
खरिपाचा हंगाम संपताच रब्बी पिकांबरोबर जास्त प्रमाणात कांद्याचे उत्पादन शेतकरी घेत आहेत व उत्पादित कांदे स्वतः प्रत्येक वाराच्या आठवडे बाजारात थेट विक्री करू लागले आहेत. मध्ये कोणताही अडत्या नसल्याने शेकऱ्यांना व ग्राहकांना दोघांनाही परवडणाऱ्या किंमतीत कांदे मिळू लागले आहेत.
मात्र सद्ध्या हंगामातील अगदी पहिलाच कांदा विक्रीसाठी आल्याने दोन किलोच्या माळेला 70 ते 100रु असा चांगला भाव मिळत आहे . आठवड्यानंतर हाच कांदा मोठ्या प्रमाणावर बाजारात आल्यानंतर माळेची किंमत अगदीच कमी होईल व ग्राहकांना स्वस्तात कांदे खरेदी करता येतील असे शेतकरी विक्रेत्यांनी सांगितले . तसेच एकरी लाख रुपयाचे उत्पन्न येते असेही सांगितले .
जास्त प्रमाणात कच्चाच खाल्ला जाणारा हा कांदा चवीला लाल कांद्याप्रमाणे उग्र नसून काहीसा गोड व जेवताना सॅलेडप्रमाणे वापरला जातो. पावसाळ्यात शेतकरी शेतात शेती काम करताना सकाळच्या न्याहरीसाठी तळलेली मिरची व हा कांदा भाकरी बरोबर तसेच दुपारच्या व संध्याकाळच्या जेवणाबरोबर खातात .
कांद्याच्या एका माळीमध्ये 30 ते 35 कांदे असतात व मळीचे वजन दोन ते अडीच व काही माळा तीन किलो पर्यंत कांद्याच्या आकारमानानुसार असतात . सुरवातीस बाजारात नवीन आलेल्या कांद्याच्या एका माळेचा भाव कांद्याच्या आकारानुसार 60 ये 100 रुपये आहे .
नंतर आवक जास्त प्रमाणात वाढल्यावर भाव कमी होतात . विरार पूर्वेतील आठवडे बाजारात हे कांदे खरेदी करण्या साठी बोरिवली ,एक्सर ,भायंदर ,मीरा रोड ,घोडबंदर,नायगाव , वसई , विरार व नालासोपारा येथील ग्राहक येतात.
कांद्याच्या तयार माळा मिळत असल्याने खरेदी केले कांदे साठवणीसाठी घरातील उंच ठिकाणी बांबू वर टांगून ठेवतात . त्यामुळे हवेत मोकळे राहिल्याने कांदे जास्त काळ टिकतात . पण हे कांदे खरेदी करताना काळजीपूर्वक योग्य सुकलेले कांदे खरेदी करावेत अन्यथा ते पुढे काळे पडण्याची भीती असते .