वसई-विरार महापालिकेत महायुती होणार 
पालघर

Palghar Politics : वसई-विरार महापालिकेत महायुती होणार

दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून स्पष्टीकरण; जागावाटपाचा फॉर्म्युला दोन दिवसात

पुढारी वृत्तसेवा

खानिवडे : वसई-विरार महापालिकेत असलेल्या 115 जागा महायुती म्हणून लढवणार आणि जागा वाटपाचा फॉर्म्युला येत्या दोन दिवसात चर्चा करून जाहीर करू अशी माहिती भाजपा आमदार राजन नाईक, स्नेहा दुबे, शिवसेनेचे आमदार राजेंद्र गावित, विलास तरे यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. निवडून येईल त्यालाच उमेदवारी असा आमचा फॉर्म्युला असल्याचे शिवसेना,पालघर जिल्हा संपर्क प्रमुख रविंद्र फाटक यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला भाजपा जिल्हाध्यक्ष प्रज्ञाताई पाटील, जिल्हा महामंत्री मनोज बारोट, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश तेंडोलकर , तालुका प्रमुख सुदेश चौधरी,वसंत चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थीत होते. दरम्यान महापालिका निवडणूक एकत्रित लढण्यावर आमचे शिक्का मोर्तब झाले आहे. असेही या नेत्यांनी सांगितले आहे. यावेळी आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात महायुतीतील प्रमुख पक्षांनी मित्र पक्षांसह श्रमजीवी संघटना व इतर समविचारी संघटना मिळून एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा ठाम निर्णय घेतला . स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्थिर व सक्षम प्रशासन देण्यासाठी महायुती कायम ठेवणे आवश्यक असल्याचे मत नेत्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक महायुतीतूनच लढवली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत महायुतीतील वरिष्ठ नेत्यांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत जागावाटप, प्रचार यंत्रणा, उमेदवार निवड आणि स्थानिक पातळीवरील समन्वय याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मतभेद बाजूला ठेवून एकत्रित लढत देण्यावर सर्वांनी एकमत दर्शवले. तसेच विकासकामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडत एकसंघ प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिकेतील विकास, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक व नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचेही यावेळी सर्वच प्रमुख नेत्यांनी सांगितले. महायुती एकसंघ असून यावेळी माहायुतीचाच झेंडा महापालिकेवर फडकणार आहे.तसेच वसई विरारची जनता ही विकासासाठीच आम्हाला मतदान देणार असून शंभराच्या वर नगरसेवक निवडून येणार असल्याने महायुतीचाच महापौर बसणार असल्याचे सांगण्यात आले.

जागा वाटपाच्या प्रश्नाला उत्तर देताना वरील नेत्यांनी सांगितले की,जागा वाटपाबद्धल आमच्यात काहीच रेशो नसून आमची प्राथमिकता ही वसई विरार शहराचा सर्वांगीण विकास करणे हे आहे.यासाठी जो कार्यकर्ता जनसेवी,कामसू आणि जनतेशी एकरूप होणारा आहे त्यांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी आमची दोनच दिवसात प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक घेतली जाणार असून महायुतीच्या सर्व घटकांना विश्वासात घेऊन उमेदवार निश्चित करण्यात येणार आहेत.येत्या 20तारखेपर्यंत सर्वच स्पष्ट होणार आहे. यावेळी भाजपा शिवसेना राष्ट्रवादी यांच्यासह श्रमजीवी संघटना ,आरपीआय, आगरीसेना यांचे संघटन महायुती म्हणून लढणार आहोत असेही सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT