Palghar Trimbakeshwar Road Pudhari
पालघर

Palghar Trimbakeshwar Road: पालघर ते नाशिक प्रवास होणार जलद!दिवाळीनंतर कामाला सुरुवात

1 हजार 187 कोटींचे काम 47 टक्के कमी दराने, स्पर्धेमुळे शासनाचे 559 कोटी वाचले?

पुढारी वृत्तसेवा

हनिफ शेख

पालघर: पालघर जिल्हयाला आज १२ वर्षांचा कालावधी होऊन गेला तरी मुख्यालय गाठताना आजही ग्रामीण तालुक्यांची दमछाक होत असल्याचे चित्र आहे. यासाठी मुख्य म्हणजे मनोर ते पालघर या रस्त्याचे रुंदीकरण होणे अत्यंत गरजेचे होतेच याशिवाय जव्हार मोखाडा विक्रमगड या भागातील नागरिकांसाठी किंवा तीर्थक्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी देखील आज गुजरात, वापी, डहाणू, पालघर आणि मुंबई सारख्या भागातून देखील याच पालघर ते नाशिक रस्त्याचा उपयोग करण्यात येतो.

मात्र हा संपूर्ण भाग घाट रस्ता असून अरुंद देखील आहे हा जुना रस्ता बनवताना तत्कालीन वाहतुकीचा अंदाज घेऊन केलेला हा रस्ता आज घडीला मोठी वाहतूक कोंडी करीत असल्याचे देखील दिसून येत होते.

अशावेळी आता या रस्त्याला मंजुरी तर मिळाली आहे मात्र याची निविदा प्रक्रिया देखील पूर्ण होऊन या कामाला आता प्रत्यक्षात दिवाळीनंतर सुरुवात होणार असल्याने पालघर वाशियांकडून समाधान व्यक्त होत आहे मात्र या रस्त्यासाठी शासनाकडून तब्बल 1 हजार 187 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते.

मात्र निविदा भरताना अनेक कंपन्यांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन आर आर एस एम इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या रस्ते निर्माण करणाऱ्या कंपनीकडून तब्बल 47 टक्के कमी दराने म्हणजेच 627 कोटी रुपयांमध्येच हे काम भरण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पालघर ते त्रंबकेश्वर होणारा हा रस्ता त्र्यंबकेश्वर कडून पालघर कडे येताना भांगेदेव मंदिराजवळून पालघर जिल्ह्याची हद्द सुरू होते तिथून संपूर्ण घाट ओलांडे पर्यंत म्हणजेच निळमाती पर्यंत हा रस्ता 7 मीटर असणार आहे.

यामध्ये दरीच्या बाजूला दीड मीटरचा फूटपाथ तर डोंगराच्या बाजूला दीड मीटर ची साईड पट्टी देखील येणार आहे याशिवाय निळ माती ते गोरवाडी म्हणजेच जव्हार शहर सुरू होण्याच्या अगोदर हा रस्ता सात मीटर रोड दीड मीटर डांबरीकरण असलेली साईट पट्टी आणि दीड मीटर मातीची साईड पट्टी याशिवाय दीड मीटरची गटर असं धरून हा तब्बल 13 मीटर रोड होणार आहे यामध्ये तीन मीटरची गटर देखील जोडण्यात आली आहे यामुळे संरक्षण भिंत सोडून हा रस्ता 13 मीटरचा असणार आहे तर जव्हारच्या बायपास वरून जाणारा हा रस्ता शहराची आणि आजूबाजूला असलेल्या घराची परिस्थिती पाहता याची रुंदी कमी होणार असून सात मीटर डांबरी रस्ता आणि 1.75 मीटरची सिमेंट गटर देखील दोन्ही बाजूंनी होणार आहे.

याशिवाय अनेक ठिकाणी पाईप डीप वळणांमध्ये तेथील परिस्थिती पाहता रस्त्याची रुंदी बदलण्याची शक्यता आहे मात्र हा रस्ता कधी होईल याची प्रतीक्षा पालघर आणि नाशिक दोन्ही जिल्ह्यातील लोकांना होती कारण की आज जव्हार मोखाडा विक्रमगड मधील अनेक नागरिक नाशिक या ठिकाणी स्थलांतरित झालेले आहेत तर जव्हार मोखाड्यातील अनेक कार्यालयीन अधिकारी हे देखील नाशिक वरून येऊन जाऊन करतात तर दुसरीकडे त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी अनेक भाविक गुजरात वापी पालघर या भागातून येत असतात मात्र या ठिकाणाची आनंद रस्ते आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे मोखाडा ते त्र्यंबकेश्वर हा 20 ते 25 किलोमीटरचा घाट पार करणे खूपदा जिकरीचे होते.

सध्या तर अवजड वाहतुकीचे प्रमाण वाढल्याने खूपदा चढ असल्याने वाहतुकीस खोळंबा होत असल्याचे दिसून येते यामुळे हा रस्ता मोठा व्हावा अशी मागणी गेल्या कित्येक वर्षापासून होत आहे मात्र आता याला मुहूर्त मिळाला असून यासंबंधी कामाला सुरुवात झाली आहे मात्र दिवाळीनंतर या कामाला अधिक वेग येणार असल्याचे या संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

प्रचंड कमी दराने काम घेणे साशंकता निर्माण करते

शासनाकडून एखाद्या कामासाठी अंदाजे किती पैसे लागतील यासंबंधी एक अंदाजपत्रक बनवण्यात येते. मात्र जर हे काम घेताना स्पर्धा निर्माण झाली तर सरकारने देऊ केलेल्या पैशांमधून काही पैशांची बचत होईल यामुळे हा नियम काढण्यात आला. अशावेळी अनेकदा 10 ते 15 टक्के कमी दराने काम भरण्याचे प्रमाण सहसा दिसून येते.

मात्र पालघर त्रंबकेश्वर या कामासंदर्भात थेट 47 टक्के कमी दराने काम भरल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यामुळे अनेकांनी तर आत्तापासूनच कामाचा दर्जा राखला जाईल का असा सवाल विचारायला सुरुवात केला आहे.

तर यातील काही तज्ञांच्या मते अशा कामांमध्ये ठेकेदाराला काम परवडण्यासाठी अनेक छुप्या नियमावली बनवलेल्या असतात त्यातून अशी काम परवडतात देखील असेही त्यांचे म्हणणे आहे. यामुळे प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतरच कामाच्या दर्जा आणि ते काम कशाप्रकारे केली जाईल याबाबत चे चित्र स्पष्ट होईलच मात्र एवढ्या प्रचंड कमी दराने काम भरल्यामुळे सर्वच आश्चर्यचकित झालेत हे नक्की.

ठेकेदार एवढ्या कमी दराने काम भरण्यास का धजावतात?

राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून सध्या राज्य दर सूचीमध्ये 10 टक्क्यांनी कपात केली आहे कारण की त्यांचे म्हणणे आहे की कमी दराने काम भरण्याच्या या प्रक्रियांमुळे ठेकेदारांना कमी पैशात काम परवडते त्यामुळे ती दर्जाची कमी केल्याचे त्यांनी सांगितले. तर सध्या राष्ट्रीय महामार्ग विभागाचे हे काम 47% कमी दराने भरण्यात आले आहे.

मात्र हा केंद्राचा विषय असल्याने याचा राज्याच्या दरसूचीवर परिणाम होत नाही मात्र एवढ्या कमी दराने काम भरण्यास ठेकेदार का धजावतात या कारणांचा शोध घेतला असता सुरुवातीला अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना ठेकेदारीकडे वळा असे आवाहन शासनाकडून करण्यात आले त्यातून काम मिळवण्यासाठी ठेकेदार हा स्वतः भांडवलदार असला पाहिजे त्याच्या स्वतःच्या मशिनरी असल्या पाहिजे असे नियमावली लावल्याने अनेकांनी मोठी गुंतवणूक करून स्वतःचे डांबर प्लांट खडी क्रशर रोलर जेसीबी ट्रॅक्टर अशा अनेक बांधकाम साहित्यांची खरेदी केली.

मात्र आज शासनाकडे या सगळ्यांना द्यायला काम नसल्याने घेतलेली मशनरी त्यासाठी आवश्यक मजूर यांना जगवायचे कसे ? यांना जगवायचे असेल तर किमान मशिनरी चालू राहिली पाहिजे या हेतूने ही कामे कमी दराने भरण्याची स्पर्धा निर्माण झाल्याचे देखील या बांधकाम विभागातील काही तज्ञ ठेकेदारांकडून सांगण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT