खानिवडे : ठाणे-घोडबंदर मार्गावरील गायमुख ते काजूपाडा घाट या मार्गांवरील रस्त्याच्या दुरुस्तीची कामे ठाणे महापालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे 12 डिसेंबर ते 14 डिसेंबर सलग तीन दिवस या मार्गांवरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आल्याची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
ठाणे-घोडबंदर मार्गांच्या दुरवस्थेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी नाराजी व्यक्त केली होती. याबाबत त्यांनी मिरा-भाईंदर महापालिकेच्या आयुक्तांना सार्वजनिकरित्या फटकारले होते. त्यानंतर फाउंटन ते गायमुखपर्यंत-मिरा-भाईंदर महापालिकेच्या ताब्यातील साडेचार किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम प्रशासनाने तातडीने हाती घेतले होते. 24 नोव्हेंबर रोजी हा मार्ग जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. हे काम पूर्ण झाल्यानंतरही गायमुख ते काजूपाडा या मार्गावर खड्ड्यांची समस्या असल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येत होती. यामुळे या रस्त्याचे काम ठाणे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठाणे महानगरपालिका कडून घेण्यात आले आहे. यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी म्हणून 12 डिसेंबर मध्यरात्री 12 वाजेपासून ते 14 डिसेंबर मध्यरात्री 12 वाजेपर्यंत या मार्गावर जड व अवजड वाहनांना बंदी घालण्यात आल्याची अधिसूचना पोलिसांकडून जारी करण्यात आली आहे.
दरम्यान, या मार्गावर वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता असल्याने आवश्यकता नसल्यास या मार्गाने प्रवास टाळावा, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून शिरसाड फाटा येथून गणेशपुरी आणि चिंचोटी खारबाव मार्गे प्रवास करता येईल. गुजरातहून येणाऱ्या वाहनांनी मनोर वाडा नाका मार्गे पर्यायी मार्गाचा वापर करावा. ठाण्याहून घोडबंदरकडे जाणाऱ्या वाहनांना वाय जंक्शनहून सरळ नाशिक रोडमार्गे मानकोलीकडे वळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रवेश बंद मार्ग
विरारहून मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना शिरसाड फाट्यापासून वरसावे दिशेचा प्रवेश बंद असणार आहे. वसईहून मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना चिंचोटी नाक्यापासून वरसावे दिशेचा प्रवेश बंद असणार आहे. मुंबई किंवा मिरा भाईंदरवरून घोडबंदर रोड मार्गे येणाऱ्या वाहनांना फाऊंटन हॉटेलजवळून ठाणे दिशेचा प्रवेश बंद असणार आहे. याची अंमलबजावणी वाहतूक विभागाचे पोलीस महामार्गावर करताना दिसून येत आहेत.
अत्यावश्यक वाहनांना अधिसूचना लागू नाही
ठाणे महापालिकेने हाती घेतलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामामुळे जड व अवजड वाहनांना जरी बंदी घालण्यात आली असली तरी पोलिसांची वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या अशा विविध अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहनांसाठी ही अधिसूचना लागू नसणार असल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले.