Temperature Rise Pudhari
पालघर

Palghar Temperature Rise: पालघरमध्ये तापमान वाढणार; पुढील पाच दिवस उष्णतेचा इशारा

शेतकरी व पशुपालकांना सतर्कतेचा सल्ला; पिके व जनावरांच्या काळजीसाठी कृषी विभागाचे मार्गदर्शन

पुढारी वृत्तसेवा

पालघर शहर : पालघर जिल्ह्यात पुढील पाच दिवसांत कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईमार्फत वर्तवण्यात आली आहे. २८ मार्च ते १ एप्रिल दरम्यान जिल्ह्यात कमाल तापमान ३३ ते ३६ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता असून, किमान तापमानातही वाढ होऊन ते सरासरी २२ ते २३ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

सकाळच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होऊन ती ९६ ते ९८ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता सरासरी ४३ टक्क्यांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी १ ते ६ किलोमीटर राहील, असेही अंदाजात नमूद करण्यात आले आहे.

कमाल तापमान वाढण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. वाढत्या उष्णतेमुळे फळबाग, उन्हाळी पिके व रोपवाटिकांमध्ये जमिनीतील बाष्पीभवनाचे प्रमाण वाढून पाण्याचा ताण निर्माण होण्याची शक्यता आहे.

पुढील पाच दिवस उष्ण व दमट वातावरण राहण्याची शक्यता असल्याने कीड व रोगांचा प्रसार वेगाने होऊ शकतो. त्यामुळे फळबागांची नियमित पाहणी करून वेळेवर उपाययोजना करणे आवश्यक आहे. जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आच्छादन (मल्चिंग) वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

उन्हाळी भात पिक पोटरी अवस्थेत असताना शेतात पाण्याची पातळी सुमारे ५ सेमी ठेवावी. भुईमूग पिक फांद्या फुटण्याच्या अवस्थेत असताना पिकातील अंतर मशागत करून तणमुक्त ठेवावे व गरजेनुसार पाणी द्यावे.

आंबा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम १२% + मॅन्कोझेब ६३% हे औषध १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. चिकू बागेत कीडग्रस्त फळे तसेच पडलेली फळे व पालापाचोळा गोळा करून नष्ट करावा.

केळी बागेत ताण कमी करण्यासाठी आवश्यकतेनुसार पाणी द्यावे तसेच पेंढा किंवा गवताचे आच्छादन करावे, त्यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होईल.

जनावरांच्या शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी त्यांना स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात द्यावे. दुपारच्या वेळी जनावरांच्या अंगावर थंड पाणी शिंपडल्यास उष्णतेचा त्रास कमी होतो. तसेच जनावरांच्या शेडच्या बाजूंना बारदाने लावावीत व शेडवर वाळलेले गवत टाकावे, जेणेकरून उष्णतेपासून संरक्षण होईल.

असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिलमार्फत शेतकरी व पशुपालकांना करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT