शिक्षक संघाचे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे  pudhari photo
पालघर

Teachers protest Palghar : शिक्षक संघाचे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी निवेदन

पुढारी वृत्तसेवा

सफाळे ः पालघर-ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ (रजि.) यांच्या वतीने राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाला जाहीर पाठिंबा दर्शवत गुरुवारी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

संघटनेच्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या संपाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी 2.30 ते सायं. 5.00 या वेळेत हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनात जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

संघटनेने सादर केलेल्या निवेदनात अनेक प्रलंबित मागण्यांवर प्रकाश टाकण्यात आला. त्यामध्ये सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी, जुनी पेन्शन योजना लागू करणे, सेवांतर्गत पदोन्नती योजना, आरोग्य विमा योजना लागू करणे, चौथ्या श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरतीवरील बंदी उठविणे, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे तसेच शिक्षण सेवक योजना रद्द करून कायमस्वरूपी नियुक्ती देणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.

तसेच रोस्टर तपासणी करावी, शिक्षक- शिक्षकेत्तर रिक्त जागा त्वरित भराव्यात आदी मागण्या करण्यात आल्या. तसेच, 15 मार्च 2024 रोजीच्या संच मान्यतेशी संबंधित निर्णय रद्द करणे आणि नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा पुनर्विचार करावा, अशी ठाम मागणीही यावेळी करण्यात आली.

या धरणे आंदोलनात पालघर- ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गणेश प्रधान, पालघर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रमोद पाटील, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गिरीश माळी, पतपेढी अध्यक्ष संतोष पावडे, संस्थाचालक संघटनेचे चिंतामण ठाकूर, यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT