Palghar tanker accident Pudhari
पालघर

Palghar tanker accident: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दीड तास वाहतूक ठप्प; ज्वलनशील रसायन वाहणाऱ्या टँकरला अपघात

5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

पुढारी वृत्तसेवा

पालघर: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघर तालुक्यातील ढेकाळे गावाच्या हद्दीतील वाघोबा खिंड परिसरात शनिवारी सकाळी ज्वलनशील रसायन वाहून नेणाऱ्या टँकरचा अपघात झाल्यानंतर रसायनाची गळती सुरु झाल्याने मोठी खळबळ उडाली.

अपघातग्रस्त टँकर सुरक्षितपणे हटवण्यासाठी महामार्गाच्या दोन्ही वाहिन्यांवरील वाहतूक तब्बल दीड तास रोखण्यात आली होती. त्यामुळे दोन्ही वाहिन्यांवर सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार,शनिवारी सकाळी वाघोबा खिंड परिसरात ब्युटाईल ॲक्रीलेट नामक रसायनाची वाहतूक करणाऱ्या टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर पलटी झाला होता.अपघातानंतर टँकरमधील ज्वलनशील रसायनाची गळती सुरु झाल्याने धोका निर्माण झाला होता.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महामार्ग सुरक्षा विभागाने तातडीने अग्निशमन दल, जिल्हा वाहतूक पोलीस, महामार्ग सुरक्षा पथक तसेच रसायन हाताळण्यात तज्ज्ञ असलेल्या कामगारांना घटनास्थळी पाचारण केले.सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी उपस्थित होते.

महामार्गावरील वाहतूक रोखल्यानंतर अपघातग्रस्त टँकर काळजीपूर्वक महामार्गावरून हटवण्यात आला.सुमारे दीड तासांच्या प्रयत्नांनंतर टँकर हटवण्यात यश आले.महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आल्याने वाहनचालक आणि प्रवाशांची गैरसोय झाली.

महामार्गावरून टँकर हटवल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. ज्वलनशील रसायनाची वाहतूक करणाऱ्या टँकरच्या अपघातामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. टँकर हटवण्याच्या कामात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रुग्णवाहीका, क्रेन, अग्निशमन दल,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि केमिकल एक्सपर्टची मदत घेण्यात आली. अपघातस्थळी जिल्हाधिकारी डॉ इंदूराणी जाखड, पोलीस अधीक्षक यतिश देशमुख ठाणे परिक्षेत्राचे महामार्ग पोलीस अधीक्षकांनी यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT