पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मस्तान नाका उड्डाणपुलाच्या पश्चिमेकडील टाकवहालच्या हद्दीतील बंद दगड खाणीत दोन अल्पवयीन मुलांचा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला.शुक्रवारी दुपारी दोघे खाणीच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
जिग्नेश विजय पवार (8) आणि आयुष मुकेश पवार (15) अशी मयत मुलांची नावे आहेत.दोघे बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर मनोर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.पोलीस कर्मचारी आणि ग्रामस्थांकडून दोघांचा शोध घेण्याचे काम सुरु केले होते.वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
खाणीत राबवलेल्या शोधमोहीमे दरम्यान जिग्नेश पवार याचा मृतदेह हाती लागला आहे.आयुष पवार याचा शोध सुरू आहे.दोन्ही मुलांची कुटुंबे मध्य प्रदेशातील येथील असून ते मनोर परिसरात आली होती. अग्निशमन दलाचे जवानांकडून खाणीत शोधमोहीम राबवली जात आहे.