ST Bus File Photo
पालघर

Palghar ST Special Buses: गणेशोत्सवादरम्यान पालघर विभागातून कोकणासाठी ५९५ बसेसचे नियोजन

गणेशोत्सवासाठी पालघर एसटी विभागाने ५९५ विशेष बसेसचे नियोजन केले आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ५६० बसेसचे आगाऊ समूह बुकिंग पूर्ण झाले आहे.

पुढारी वृत्तसेवा

पालघर शहर: एसटी महामंडळाच्या पालघर विभागाकडून यंदाच्या गणेशोत्सवासाठी ५९५ विशेष बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची आणि गणेशभक्तांची गर्दी लक्षात घेता या बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

कोकणात जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटीने आगाऊ आणि गट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली होती. या सुविधेला गणेशभक्त मंडळे आणि नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत तब्बल ५६० बसेसचे 'आगाऊ समूह बुकिंग' पूर्ण झाले आहे.

विविध गणेशभक्त मंडळे कोकणातील आपल्या मूळ गावी तसेच इतर देवदर्शनासाठी या बसेसचा वापर करणार आहेत. याशिवाय, वैयक्तिक प्रवाशांसाठी १६ बसेस आरक्षणासाठी ठेवण्यात आल्या आहेत. प्रवाशांची मागणी जशी वाढेल, तसतशी आरक्षण बसेसची संख्या आणखी वाढवण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

गणेशोत्सवापूर्वी म्हणजेच ११, १२ आणि १३ सप्टेंबर रोजी पालघर जिल्ह्यातील विविध आगारांमधून या सर्व विशेष बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी मार्गस्थ होणार आहेत. जिल्ह्यातील नालासोपारा, अर्नाळा आणि वसई या भागांतून सर्वाधिक बुकिंग झाले असून, या भागांतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. तसेच दीड दिवस, अडीच दिवस व पाच दिवसाच्या गणपती नंतर टप्प्याटप्प्याने या बस गाड्या परतीचा प्रवास करणार आहेत.

पालघर जिल्ह्यातून एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर गाड्या सोडायच्या असल्याने स्थानिक गाड्यांची टंचाई भासू नये, यासाठी एसटी महामंडळाने इतर विभागांतूनही अतिरिक्त बसेस मागवून घेतल्या आहेत. या विशेष बसेस मुख्यत्वे चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, श्रीवर्धन, दापोली, मंडणगड, माण, रायगड, राजापूर यासह कोकणातील विविध प्रमुख मार्गांवर धावणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT